Breaking News

बीड बायपासवर मनपाकडून पाडापाडी मोहीम

औरंगाबाद, दि. 31 - बीड बायपासचा सर्व्हिस रोड मोकळा करून तो 200 फुटांचा करण्यासाठी मनपाकडून पाडापाडी मोहीम हाती घेतली जाणार आहे. याची तयारी सुरू झाली असून आज दुपारी ही कारवाई होऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ही मोहीम नेमकी कधी सुरू होईल, हे अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. येथील मालमत्ताधारकांना जास्तीचे बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी दिलेली 15 दिवसांची मुदत सोमवारी सायंकाळी संपल्याने कोणत्याही क्षणी ही मोहीम सुरू होऊ शकते. मनपाने मालमत्ताधारकांना 15 दिवसांची अंतिम नोटीस बजावल्यानंतर येथील 30 पेक्षा मालमत्ताधारकांनी यास आक्षेप घेतला होता. भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही, मालमत्ताधारकांना मोबदला दिला नाही, मनपाने आधी ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतरच पाडापाडीची मोहीम हाती घ्यावी, असे लेखी आक्षेपात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाईल, हे स्पष्ट करण्यात आले नाही. बीड बायपासवरील अपघात तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याने हा रस्ता विकास आराखड्यानुसार 200 फुटांचा करण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह स्थानिक रहिवाशांनी पुढे केली होती.