Breaking News

...आणि म्हणून शेतकरी जातोय संपावर!

दि, 01. जून -  आज एक जुन.. मान्सूनच आगमन होत असताना जगाचा पोशिंदा संपावर जातोय. सत्ताधार्‍यांनी नागवलं... विरोधकांनी त्याच्या भावनांचे राजकारण करून फसवलं. म्हणून नैराश्यातून आत्महत्या करणारा शेतकरी अनुभवातून शहाणा झाला. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मृतदेहाचेही राजकारण करणार्‍या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी शेतकरी संपावर जातोय.संपाच्या निमित्ताने कुठल्याही पारंपारिक नेतृत्वाशिवाय संघटीत झालेला हा शेतकरी आपल्या भावना आता मोकळ्या करू लागला आहे. त्याच भावनांना शब्दरूप देणारी ही दखल...
होय शेतकरी संपावर जाणार! कारण जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी आज उपाशी आहे. शेतकर्‍याकडे लक्ष द्यायला आज कुणालाही वेळ नाही. होय! तो स्वार्थी झालाय ,कारण तो सर्वांसाठी राबतो, मात्र तो जगतो कसा? आत्महत्या का करतो हे जाणून घेण्यात कुणालाही स्वारस्य नाही. शेतकरी कर्जमाफी नाही मागत,तर तो मागतो आहे कर्जमुक्ती.. भीक नाही आपला  हक्क मागतोय. शेतकर्‍याने कर्ज घेतले  ते बियरचे कारखाने सुरू करण्यासाठी नाही, शेतीत तंत्रज्ञान आणून अन्न धान्य पिकवण्यासाठी, पिकवलेले जगाला पुरवण्यासाठी.
मात्र कधी निसर्गाने साथ दिली नाही,तर कधी शासनाने तर कधी ग्राहकाने, म्हणून तो कर्जबाजारी झाला. स्वतःचे साम्राज्य उभारण्यासाठी नाही घेतले त्याने कर्ज.किःवा ऐहिक उपभोगाच्या छंदफंदी नादात कर्ज बुडवले नाही त्याने. आणि म्हणूनच तो कर्जमुक्ती मागतोय कारण त्याला जगायचंय त्याच्या मुलीच्या छोट्या खानी कन्यादानासाठी.. शाही विवाहाचा डामडौल नाही मिरवायचा त्याला. त्याला जगायचंय मुलाच्या शिक्षणासाठी,त्याला जगण्यापूरत का होईना शिक्षण देण्यासाठी, शिक्षण सम्राटांचे इमले भरण्यासाठी नाही.
हा तो शेतकरी आहे जो जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणार्‍या त्याच्या  मुलाला पुस्तक घेऊन देऊ शकत नाही, परिस्थितीशी झगडून शिकणार्‍या  मुलीला पास काढून देऊ शकत नाही  दिवाळीला बायकोला साडी घेऊ शकत नाही की मुलांना कपडे. सणासुदीला गोड धोड करू शकत नाही तोच हा शेतकरी. घरात तेलाचा दिवा लागतो तो आत्महत्या केल्यावर.. नवे कपडे येता ते त्याच्या पार्थिवावर. हा तो शेतकरी नाही, जो निवडणुकीचा अर्ज भरताना 5 एकर शेतीत 10 करोड उत्पन्न दाखवतो. हा तो शेतकरी आहे ज्याचे पिकलेले पण उगवले नाही, केलेला खर्च पण वसूल होत नाही. तरीही कर्ज घेतोय न पेरतोय कारण त्याला सतत आशा असते कधीतरी पिकेल न आपले कर्ज फिटेल. स्वतःच्या अडचणीसाठी मी दुसर्‍याला का उपाशी ठेवू म्हणून तो पिकवतोय अन त्यासाठीच कर्ज घेतोय. पण नाही आत्ता तो स्वार्थी होणार कारण त्याला माहितेय आता डोक्यावरून पाणी जातंय, जगणं असह्य होतय ..त्याला माहितेय आत्ता नाही तर कधीच नाही आज त्याला स्वतःची किंमत कळतेय. विनातारण 10000 करोड रुपये कर्ज देणार्‍या बँका करोडो रुपये एनपीए दाखवतेय शेतकर्‍याची लाख मोलाची काळी आई गहान ठेऊन पण शेतकर्‍याला भिकारी समजताय. मतदार राजा म्हणून शेतकर्‍याला गोंजारणारा सत्ताधारी शेतकर्‍याला साला म्हणतोय, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी शेतकर्‍याचा कैवारी असणारा विरोधक सत्तेत गेल्यावर त्यांनाच शिव्या हासडतोय आणि म्हणूनच तो संपावर जातोय. कारण त्याला आता सन्मानाने जगायचंय, वेगवेगळ्या जातींमधून तो आरक्षणासाठी एकत्र आला, आता शेतकरी म्हणून सन्मानाने जगण्यासाठी जातपात ओलांडून  एकत्र येतोय. लाख अमिष दाखवलं तरी तो बळी पडणार नाही लाखो गाजरं दाखवले जातील पण नाहीं, थोड्या हव्यासासाठी ही संधी दवडणार नाही. होईल त्याचं नुकसान थोडे दिवस रोजच्या मरणापेक्षा तो ते सहन करील. आता तो विरोधक नाही अन् सत्ताधारीही नाही.
आता तो आहे  फक्त शेतकरी आणि शेतकरी.. ना कुठला धर्म ना कुठली जात ना पक्ष ना पंथ. म्हणून तो संघटीत होऊन संपावर जातो आहे.त्यासाठी त्याला कुणी सांगायची गरज नाही, स्वयं स्फूर्तीने अन् स्वप्रेरणेंने संपावर जातोय. आज पासून तो कुठल्याही प्रकारचे अन्न धान्य,भाजीपाला कुठल्याच बाजारात विकणार नाही तो समृद्धी मागत नाही, मेट्रो मागत नाही, बुलेट ट्रेन मागत नाही ते तुम्हालाच लख लाभ होवो, तो मागतोय त्याच्या पिकाला हमी भाव, तो मागतोय त्याच्याया मुलाला हक्काचं शिक्षण, तो  मागतोय त्याची हिसकावून घेतलेली सामाजीक प्रतिष्ठा.  तो मागतोय जगण्याचा हक्क. सिंचनासाठी  तोकड अनुदान नको अभ्यासपूर्ण मदत हवी , जास्त काही नको तुमच्या एका स्वप्नातल्या प्रकल्पाइतकं ..त्याच हक्काचं असलेलं थोडस ...कर्जमुक्त करून द्या इतकंच . शाही विवाह करून तो कुणाचा सालाहोऊ  शकत नाही ते त्यांनीच करावे शेतकर्‍याची ती जातकुळी नाही अन् असलीही तरी शेतकर्‍याला तेव्हढा  माज  नाही. शेतकर्याला दानवा कडून आश्‍वासन हवंय की पुढील फक्त 5 वर्ष कुठेही दुष्काळ पडणार नाहीवर्ष गारपीट होणार नाही. कांदा भविष्यात कधीही 200 रुपये जाणार नाही, सोयाबीन कापूस, ज्वारी बाजरी मका, दुध, फळं, उसाला हमी भाव मिळत राहील. प्रत्येक शेतकर्‍याच्या मुलीच साधं का होईना लग्न सरकार करून देईल नाहीतर  सत्ताधारी म्हणून ना-लायक ठरलो असं कबूल करील.