Breaking News

तरुणाला जीपला बांधले नसते तर अनेकांनी प्राण गमावले असते - मेजर गोगोई

श्रीनगर, दि. 24 - त्या दिवशी मी तरुणाला जीपच्या बोनेटवर बांधले नसते तर अनेक स्थानिकांना आपले प्राण गमवावे लागले, असते असे सांगून मेजर  गोगोई यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. तसेच मला मिळालेला पुरस्कार हा काश्मीरी युवकाला जीप बाधल्यांमुळे मिळाला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, बडगाममध्ये 9 एप्रिल रोजी पोटनिवडणूकीदरम्यान गुंडीपूराजवळील मतदान केंद्रावर जमावाने दगडफेक सुरू केली. निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा  दलाचे जवान एका मतदान केंद्रामधील कार्य पाहत होते. त्यामुळे मी घटनास्थळी गेलो. घटनास्थळी जात असताना रस्त्यांवरील अनेक अडथळे पार करुन मी अर्ध्या  तासानंतर घटनास्थळी पोहचलो. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. काही अंतरावर फारूख डार हा युवक जमावाला दगडफेक करण्यासाठी  उकसवत होता. अथक प्रयत्नानंतर त्याला अटक करण्यात आली. फारूखला पकडल्यामुळे जमाव अधिकच हिंसक होऊन दगडफेक करत होता. त्यानंतर मला त्याला  जीपला बांधण्याची कल्पना सुचली. त्याला जीपला बांधल्यानंतर जमावाने दगडफेक करण्याचे थांबवले. त्यावेळी तेथे 1200 जणांचा जमाव होता. त्यांना  वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.