Breaking News

मोदी सरकारच्या कामांचा भाजपचे मुख्यमंत्री करणार प्रचार

नवी दिल्ली, दि. 24 - मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भाजपचे विविध राज्यांमधील मुख्यमंत्री देशभरातील भाजपची  सत्ता असलेल्या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौ-यात ते मोदी सरकारने तीन वर्षात केलेल्या कामांची माहिती राज्यातील नागरिकांना देणार आहेत.
‘लोकशाहीचा उत्सव’ असे या दौ-याचे नाव असून 26 मे ते 15 जून या कालावधीत सर्व मुख्यमंत्री नियोजित राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौ-याअंतर्गत एकूण  सहा राज्यांचा दौरा करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बिहार दौ-यावर जाणार आहेत. तर, आगामी विधानसभा निवडणुकांच्या  असलेल्या प. बंगालमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग हे प्रचार आणि प्रसार करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना केरळ, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना तेलंगणा, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना त्रिपुरा तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंग चौहान यांना ओडिशा या राज्यांत प्रचाराची जबाबदारी दिली आहे.
या दौ-यांव्यतिरिक्त मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया (मोदी) आणि सबका साथ सबका विकास परिषद या खास कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘मोदी’  कार्यक्रम हा तरूणांना आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे, तर सबका साथ सबका विकास परिषदेमार्फत सरकारी योजनांच्या लाभार्थींची भेट  घेतली जाणार आहे.