Breaking News

भारताविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का

लाहोर, दि. 24 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध 4 जूनला होणार आहे. पण या सामन्याआधीच पाकिस्तानला एक  मोठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून दोन फिटनेस टेस्टमध्ये पात्र न ठरल्यानं पाकिस्तानी फलंदाच उमर अकमलला माघारी बोलावण्यात आलं आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानी संघात उमर अकमलची निवड करण्यात आली होती. मात्र, फिटनेस टेस्ट पास न होऊ शकल्यानं पीसीबीनं अकमलला इंग्लंडहून  परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. उमर अकमलच्या जागी उमर अमीन किंवा हारिस सोहेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या निवड समितीत  चर्चा सुरु आहे.
क्रिकइन्फोनं पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या हवाल्यानं असं म्हटलं आहे की, ‘तो (उमर अकमल) चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ट्रेंनिग  कॅम्पमधील दोन फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरला आहे. त्यामुळे अनफिट खेळाडूंना खेळवू नये असा आमचा नियम आहे. त्यामुळेच आम्ही त्याला मायदेशी  बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.’ ‘आम्ही त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवू. आमच्याकडे 25 मेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे नेमकं कोणाला पाठवायचं यासाठी  आमच्याकडे थोडा वेळ आहे.’ असंही शहरयार म्हणाले. मागील महिन्यात वेस्टइंडिज दौर्‍यासाठी उमर अकमलची निवड करण्यात आली नव्हती. पण चॅम्पियन्स  ट्रॉफीसाठी त्यानं संघात पुनरागमन केलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याला संघाबाहेर राहावं लागणार आहे.