Breaking News

सुदीरमन बॅडमिंटन स्पर्धेत चीनकडून भारताचा धुव्वा

गोल्ड कोस्ट, दि. 27 - ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या सुदीरमन बॅडमिंटन स्पर्धेत चीनने भारताचा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना मिश्र दुहेरीचा होता. भारताच्या अश्‍विनी पोनप्पा आणि स्तिवकसाईराज जोडीने सकारात्मक खेळ करत पहिला गेम जिंकला. मात्र, त्यानंतर लू काय आणि हुआंग याकीयॉन्ग या चीनी आक्रमणापुढे त्यांचा खेळ फिका पडला आणि चीनच्या जोडीने सामना 16-21,21-13, 21-16 असा जिंकला. दुस-या सामन्यात पुरूष एकेरी प्रकारात एकतर्फी सामन्यात चेन लाँगने किदंबी श्रीकांतला 21-16, 21-17 असे नमवले. तर तिस-या सामन्यात मिश्र दुहेरी गटात भारताची अवस्था केविलवाणी झाली. चीनच्या फु हायफेंग आणि झँग नान जोडीने भारताच्या जोडीला 21-9, 21-11 असे पराभूत केले.
या विजयाबरोबरच चीनने उपांत्यपूर्व फेरीत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली असल्यामुळे महिला एकेरीतील सिंधूचा सामना आणि महिला दुहेरीतील अश्‍विनी-सिक्की जोडीचा सामना केवळ औपचारिकता राहिली आहे.