Breaking News

पश्‍चिम बंगालमध्ये पाया विस्तारण्याचा रा.स्व. संघाचा प्रयत्न

कोलकाता, दि. 27 - बहुसंख्य मुस्लीम संख्या असणार्‍या पश्‍चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात तलवारी आणि त्रिशूळ घेऊन भगवी वस्त्रे परिधान करून राम नवमीच्या दिवशी जय श्री रामाचा गजर घुमला. यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या संघटनेचा विस्तार या भागात करत असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षात मुस्लीमबहूल मालदा भागात संघटनेचा विस्तार करणे कठीण जात आहे. या भागात हिंदूविरोधी विचारसरणी आहे, ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते तरुण कुमार पंडीत यांनी सांगितले. या भागातील एका शाळेत संघाच्या सुमारे 115 कार्यकर्त्यांनी 20 दिवसाच्या शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये राष्ट्र उभारणी आणि संघाच्या गणवेशात मैदानी खेळाची माहिती तसेच प्रशिक्षण देण्यात आले. दक्षिण बंगालमधील हावडा जिल्ह्यात या शिबिरात 325 जणांनी सहभाग नोंदवला. तर मालदामधील 11 विद्यार्थांनी यात सहभागी झाले. जानेवारी 2016 मध्ये जमावाने कालीचक पोलीस ठाण्याला आग लावण्याच्या घटनेची आठवण त्यांनी करून दिली.
संघाचे दक्षिण बंगाल भागातील कार्यवाह जिष्णू बसू यांनी पत्रकारांना खुले पत्र पाठवून मुख्यधारेतील प्रसारमाध्यमे हिंदू गावावर झालेल्या हल्ल्याबाबत गप्प का, असा प्रश्‍न केला. गेल्या काही वर्षात मालदा, मुर्शिदाबाद, बर्डवान, नाडिया, उत्तर आणि दक्षिणमधील 24 परगणा या भागात अशा घटना वारंवार घडत असून यामुळे आगामी काही वर्षात पश्‍चिम बंगालचा पश्‍चिम बांगलादेश होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपली विचारसरणी या भागात रुजवण्याचा प्रयत्न संघाकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाची ताकदही राज्यात वाढलेली आहे. त्यामुळे डावे आणि तृणमूल काँग्रेसची विचारसरणी न मानणार्‍यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गणेशोत्सवासारख्या मोठ्या धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून संघ विस्तार करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.