Breaking News

भाजपा जिंकला, भाजपा हरला...!

दि. 27, मे - नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असतांना महाराष्ट्रातील तीन वेगळ्या प्रकृतीच्या महापालिकांचे निकाल जाहीर होत होते.या निकालातून जनतेने पुन्हा एकदा राजकीय पक्षांना गृहीत न धरण्याचा इशारा दिला आहे.हे निकाला पहाता राजकीय पक्षांच्या थिंक टँकने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेषतः मालेगावमध्ये एमएमआयला मिळालेले यश प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी इशारा देणारे ठरावे.
गेली तीन वर्ष देशावर मोदी नावाचे गारूड स्वार झाल्यानंतर होत असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणूकीत भाजपाला मिळत असलेले यश प्रस्थापित काँग्रेससह राष्ट्रवादी,शिवसेना व अन्य प्रादेशिक पक्षांना चिंता लावणारे आहे.देश काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच भाजपाने उचलला आहे असेच हे यश सांगते.शुक्रवारी महाराष्ट्रातील तीन महापालिकांचे निकाल जाहीर झाले ते पहाता भाजपाची काँग्रेस मुक्तीची मोहीम भविष्यात रोखली जाऊ शकते असा एक मतप्रवाह प्रवाहीत होऊ शकतो.अर्थात या निकालाचा अन्वयार्थ काढण्यासाठी विविध कंगोर्यांचा विचार करावा लागेल.
मालेगांव,भिवंडी-निजामपुर आणि पनवेल या तीन महानगर पालिकांपैकी पनवेल वगळता अन्य दोन्ही मनपांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही.पनवेल मध्ये मिळालेली सत्ता देखिल भाजपाचे यश असल्याचे राजकीय तज्ञ सहजासहजी मान्य करायला तयार नाहीत.इतर पक्षातील तयार पहिलवान  आपल्या तालमीच्या नावावर कुस्तीच्या आखाड्यात उतरविण्याची खेळी पनवेल मध्ये भाजपाला यश देऊन गेली.पनवेल मध्ये भाजपा नव्हे तर ठाकूर जिंकले असा दावा केला जातो,मोदींची मोहीनी ,स्थानिक मुत्सुद्दी व्यवस्थापन आणि सोबत ठाकुरांचा पैसा हेच पनवेलच्या यशाचे गमक असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेला पनवेलमध्ये नेमकं काय करायचं हेच उमगल नाही.पनवेलच्या राजकीय रणांगणवर मुख्य शञू कोण?नेमकं कुणाशी लढायचं हेच शिवसेनेला शेवटपर्यंत ताडता आलेलं दिसत नाही.पनवेल ही नवी मनपा आहे.मनपासाठी स्थानिक मतदार पहिल्यांदाच निवडणूकीला सामोरा गेला.शहरी आणि ग्रामिण असे दोन गट यावेळी दिसले.त्याचा फटका शेकापला बसला.सोबत अस्तित्व हिरावलेल्या काँग्रेस -राष्ट्रवादी सोबतचा घरोबाही शेकापला महागात पडला. नेमकी याउलट परिस्थिती मालेगाव भिवंडीमध्ये दिसते आहे.भिवंडीत आजपर्यंत ञिशंकु अवस्था होती तीच पुन्हा दिसते आहे.त्यातल्या त्यात काँग्रेस यंदा चांगली सावरतांना दिसते आहे,शिवसेना आपली पुर्वीची पत सांभाळण्यात यशस्वी झाल्याचे दिसत असले तरी भाव माञ कोसळला. मालेगावचा विचार करता प्रचार कालावधीत भाजपा बर्यापैकी जागा घेईल अशी अपेक्षा होती.भाजपाच्या इतिहासात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार आणि बिफवर लादलेली बंदी उठविण्याचे आश्‍वासनही मालेगावच्या मतदारांना भावले नाही.अर्थात मालेगावमध्ये भाजपाला गमावण्यासारखे काहीच नव्हते.मिळेल ते बोनस.या परिस्थितीत भाजपाने मारलेली मजल समाधानकारक आहे असे सांगीतले जात असले तरी सबका साथ सबका विकास या आश्‍वासनाचा तो मुखभंग आहे. शिवसेनेला माञ या ठिकाणी अपेक्षित कामगीरी करता आली नाही.मालेगाव दाभाडीचे शिवसेनेचे नेतृत्व सहकार राज्यमंञी दादासाहेब भुसे यांची राजकीय ताकद अजमावणारी ही निवडणूक होती. या सर्व घटकांच्या पार्श्‍वभुमीवर काँग्रेसने उत्तम कामगीरी साधली असे म्हणावे लागेल.त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही सरस ठरली.हे दोन पक्ष एकञ लढले असते तर चिञ वेगळे असते.या निवडणूकीच्या निमित्ताने एमआयएमने उत्तर महाराष्ट्रात शिरकाव केला आहे,ही बाब राजकीय पक्षांची डोकेदुःखी ठरली नाही तरच नवल.