पाकच्या कुरापतींना वेसन घालण्याची गरज!
दि. 27, मे - भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान नेहमीच कुरापती काढून भारताची शांतता भंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या ना‘पाक’कारवायांना आता वेसन घालण्याची लगाम लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारतीय हद्दीतील सियाचीन येथून पाकच्या हवाई विमानाने उड्डाण केल्याचा पोकल दावा करत, भारतीय सुरक्षाव्यवस्था किती कमजोर आहे, हे दाखवण्यासाठीच पाकने आपण भारतीय हद्दीत घुसल्याचा दावा केला होता. मात्र त्या घटनेत कोणतेही तथ्य नाही, तरी मोठयाने आव आणण्याचा पाकची जुनीच खोड आहे. भारतीय हद्दीत नेहमीच घुसखोरी करून, बॉर्डरवर नेहमीच तणावाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. मागील एका वर्षांत तर अनेकवेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन देखील करण्यात आले. त्यामुळे पाकच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शुक्रवारी पुन्हा जम्मूमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमेवर कृती पथकाकडून (बॅट) करण्यात आलेला हल्ला भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. मात्र यात दोन भारतीय जवान शहीद झाले. यापूर्वीही भारतीय जवांनांच्या मृतदेहाची विटंबना करण्याचे कृत्य पाकने केले होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग, मात्र ईशान्येकडे जसे दुर्लक्ष झाले, तसेच ते काश्मीरकडे सुध्दा झाले, त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पाळेमुळे खोलवर रूजली आहे, ती पाळेमुळे खणण्यासाठी आपल्याला आता जड जात आहे. काश्मीरमुद्दा हा आज उद्भवलेला प्रश्न नसून, स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला मिळालेली एक समस्या आहे, ज्यातून तोडगा काढण्यासाठी कोणत्याच सरकारने खंबीरपणे पाऊल टाकले नाही, की ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळेच हिसांचार वाढच चालला आहे, अनेंक दहशतवादी तयार होत आहे, काश्मीरच्या जनतेचे जनजीवन विस्कळीत होत चालले आहे‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुरहाण वणी याला ठार केल्यानंतर काश्मीर खोर्यामध्ये उफाळलेला हिंसाचार हा भयानक होता. जमावाकडून काही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांना आग लावल्याच्या, तर पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या, तर काही पोलिसांच्या ऑटोमेटिक रायफल्स पळवण्यात आल्या. या सर्व घटनांवरून पाक काश्मीरमध्ये आणि बॉर्डरवर नेहमीच कुरापती काढून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, हे आता उघड आहे. त्यामुळे पाकला फक्त सुनावून चालणार नाही तर, काश्मीर प्रश्नावर केंद्रसरकारने ठोस कार्यक्रम हातात घेण्याची गरज आहे. काश्मीर परिस्थितीमध्ये काहीही बदल न करता, जैसे थै परिस्थितीमध्ये ठेवायचे अशीच मानसिकता केंद्र सरकारकडून दिसून येत आहे. आज काश्मीरमध्ये भाजपाचे संयुक्त सरकार आहे. हे विशेष, त्यामुळे भाजपाकडून ठोस कृतीची गरज आहे. पाकिस्तान नेहमीच दहयतवाद्यांना आश्रय, आणि रसद पुरवतो, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे, तरी पाकच्या मैत्रीला एकीकडे गोजांरायचे आणि दुसरीकडे असे हल्ले सहन करायचे असा आपला एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये आता विकासासाबरोबर तेथील स्थानिक जनतेलापण आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही तुमचे जीवन, योग्यपध्दतीने, सुरक्षित जगु शकतात, हा विश्वास निर्माण करावा लागणार आहे, तेव्हाच कुठे काश्मीरमध्ये पसरलेले दहशतवाद्यांची पाळेमुळे उखडून फेकणे शक्य होईल, अन्यथा 2-3 महिने झाले की, दहशतवाद, अनेकाचे जीव जाणे हे नित्याचेच होईल.
