Breaking News

गोहत्येविरोधातील संघटनांचा संबंध भाजपशी जोडणे योग्य नाही - नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. 24 - गोहत्येविरोधात कार्य करत असणार्‍या संघटनांचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडणे योग्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते  विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला तीन वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. 
केंद्र सरकार हे गांभिर्याने सबका साथ, सबका विकासाच्या ध्येयाने काम करत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आम्ही सांप्रदायिक राजकारण करत नाही आणि जात,  पंथ, धर्म किंवा भाषेच्या आधारावर आपण कोणाशीही भेदभाव करत नाही. गोवंश आणि हिंसाचाराच्या काही घटनांसाठी जबाबदार असणार्‍या संघटनांना भाजपाशी  जोडणे चुकीचे आहे. जे कायदा हातात घेतात त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेस निवडणुकांमध्ये त्यांना बसलेला धक्का अद्याप पचवू शकलेले नाही आणि म्हणूनच ते सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसला नैराश्य आले आहे. महात्मा  गांधींनी काँग्रेस पक्ष विसर्जित केले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. मात्र, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हा पक्ष पुढे सुरू  ठेवला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधींचा सल्ला गांभीर्याने घेतला असून तो पूर्ण करण्यासाठी राहुल अथक परीश्रम घेत आहेत, असा टोला त्यांनी  लगावला. आगामी राष्ट्रपती निवडणुकांसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पक्षामध्ये अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. तथापि, भाजप सर्व बाजूने सहमती  निर्माण करण्यासाठी तयार आहे.