Breaking News

भारत-जर्मनी यांच्यातील आर्थिक संबंध दृढ व्हावेत - पंतप्रधान मोदी

बर्लिन, दि. 31 - भारत व जर्मनी या देशांत आठ महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील करारांवर आज स्वाक्ष-या करण्यात आल्या. यामध्ये सायबर, विकासात्मक प्रकल्प, शहरी विकास, कौशल्य विकास, रेल्वे आधुनिकीकरण, दहशतवाद, स्मार्ट सिटी आदी क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी दोन्ही देशांतील आर्थिक संबंध वृद्धिंगत व्हावेत . दोन्ही देश परस्परांच्या सहकार्यातून प्रगती करू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. या वेळी जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मार्केल या उपस्थित होत्या.
दोन्ही देशांतील संबंधांमुळे अधिक चांगली आर्थिक स्थिती निर्माण व्हावी. भारत पुढील पिढीतील पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देत आहे. या एका क्षेत्रात जर्मनीसोबत मोठ्या प्रमाणावर काम करण्याची भारताची इच्छा आहे. दहशतवाद हा भविष्यातील पिढ्यांसाठी गंभीर धोका आहे आणि त्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य व्यापक स्तरावर वाढले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताने चांगला सहकारी देश असल्याचे सिद्ध केले आहे आणि दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होऊ शकतात, असे चॅन्सलर मार्केल म्हणाल्या.
चॅन्सलर कार्यालयात पंतप्रधान मोदी यांचे लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. या वेळी मार्केल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर भारतीय शिष्टमंडळातील सदस्यांची ओळख करून देण्यात आली.