Breaking News

उत्तराखंडात अडकलेले जळगावचे 61 भाविक सुखरूप

जळगाव, दि. 22 - बद्रीनाथ उत्तराखंड येथे शुक्रवारी दरड कोसळून बद्रीनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. मंदिर परिसरात मेहरुण येथील 61 भाविक  अडकले असून त्यांच्याशी रात्री संपर्क साधला असता सर्व लोक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. एका मंदिरात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  लष्कराचे जवान व अधिकारी यांची त्यांना मदत मिळत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने मंदिरावर जाण्याचा मार्ग तत्काळ मोकळा करावा. यामुळे भाविकांची  लवकर सुटका होईल, अशी मागणी अ.भा. वंजारी युवा संघटनेने केली असून आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील भाविकांच्या सुटकेसाठी कार्यकर्त्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी मुंबई येथे संपर्क साधला. त्यानंतर आ. भोळे यांनी  या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आज सायंकाळपर्यंत हा मार्ग मोकळा होणार असून सर्व भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. असे आश्‍वासन  मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आ. भोळे त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील घुगे, कैलास वंजारी, विलास वंजारी,  वैभव ढाकणे, ऋषीकेश वाघ, प्रकाश कराड, विशाल घुगे, शुभम वंजारी, सोमनाथ पाटील, चेतन सानप, विशाल लाड आदी उपस्थित होते.