Breaking News

नोकराने मालकास 78 हजारात गंडविले!

जळगाव, दि. 22 - कार्यालयातील नोकरानेच मालकाचे 23 चेक लांबवून त्यापैकी तीन चेक वटवून मालकास 78 हजार रूपयांना गंडा घातल्याचा मामला शनिवारी  शहरात उघडकीस आला. विशेष म्हणजे नोकराने मालकाची बनावट स्वाक्षरी करून हे चेक वटवून घेतले.
नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल हे शिवकॉलनी परिसरात वास्तव्यात आहेत. गोलाणी मार्केटमध्ये त्यांचे भूषण इस्टेट नावाचे कार्यालय आहे. इस्टेट एंजटच्या अनुषंगाने  येथे कामकाज चालते. त्यांच्या कार्यालयात चार महिन्यांपूर्वी मोहाडी रोड परिसरातील अक्षय बाविस्कर हा तरूण नोकर म्हणून कामाला होता. कार्यालयात खंडेलवाल  यांचे स्टेट बँकेचे चेकबुक होते. या बुकातून नोकराने 23 कोरे चेक चोरून नेले..नंतर वेगवेगळी रक्कम टाकून घेत नोकराने बनावट स्वाक्षरी करून ते चेक वटवून घेत  78 हजार रूपये जिल्हापेठ हद्दीतील स्टेट बँकेतून परस्पर लंपास केले.
अशा पध्दतीने वटविले चेक
अक्षयने चेक फाडल्याची कोणालाही कुणकुण लागू न देता टप्प्याटप्प्याने ते वटविले. संशयित नोकराचा भाऊ भाऊ मयूर व पत्नी पूनम हिच्या नावाने कार्यालयात  असतानाच तीन चेक स्टेट बॅँकेतून वटविले. चेकबुकमधून गहाळ केलेल्या 23 चेक पैकी 18 हजाराचा एक चेक फेब्रुवारी महिन्यात तर दुसरा 20 हजार रकमेचा मार्च  महिन्यात असे दोन चेक त्याचा भाऊ मयूर यांच्या नावाने बँकेत जावून वटवून घेतले. तीसरा चेक त्याने 28 एप्रिलला पत्नी पूनम हिच्या नावाने वटवून घेतला.