अरूणाचल प्रदेश भारताचाच अविभाज्य भाग : परराष्ट्र मंत्रालय
नवी दिल्ली, दि. 21 - अरूणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी आज व्यक्त केली . चीनने अरूणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची प्रमाणित नावे घोषित केल्याप्रकरणी भारताने यावर आक्षेप घेतला. एखाद्या जागेचे दुसरे नाव ठेवून किंवा नामकरण करून त्या जागेचा ताबा घेतला जाऊ शकत नाही. एखाद्या ठिकाणाचे नाव बदलून अनधिकृतपणे मिळवलेले ठिकाण कायदेशीर होऊ शकत नाही अशा शब्दांत बागले यांनी चीनला सुनावले. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरूणाचल प्रदेश दौर्यानंतर चीनने हे पाऊल उचलले. या प्रकरणी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. वोग्यॅनलिंग, मिला री, कोईदेंगारबो री, मेनकुका, बुमो लापब री अशी चीनने अरूणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची प्रमाण नावे घोषित केली.