नवी मुंबई महापालिका हरित क्षेत्र विकासासाठी दोन कोटी खर्च करणार
नवी मुंबई, दि. 21 - नवी मुंबई महापालिकेने शहरातील ठराविक भागात हरित क्षेत्र विकास करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी दोन कोटी खर्च करण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत हा हरित क्षेत्र विकास करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनातर्फे 1 कोटी रुपये निधी महापालिकेला मिळणार आहे. हरित क्षेत्र विकास करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने मे. असिम गोकर्ण (लॅन्डस्केप) सल्लागार यांच्याकडून सदर विकास कामाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करवून घेतले आहे. यामध्ये या हरित क्षेत्राचा विकास करतांना शहरातील हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरातील पशुपक्षांचा अधिवास व अन्नसाखळी टिकून राहिल व जैविक विविधतेचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच जैविक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल यांची तीव्रता आणि परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल या प्रकल्पा अंतर्गत टिकवून ठेवला जाणार आहे. त्यानुसार अमृत अभियानाअंतर्गत हरित क्षेत्र विकासासाठी नेरुळ येथील ज्वेल पार्क मधील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.