Breaking News

जनतेशी संवाद नसल्याने संवादयात्रा काढण्याची वेळ -अजित पवार

श्रीरामपूर, दि. 30 - शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर काँग्रेस व राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेवर टिका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवादयात्रा काढणार आहे. जनतेशी संवाद नसल्याने यात्रा काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. यात्रा गावोगाव जाईल तेव्हा त्यांना शेतकरी जाब विचारतील असा इशारा माजी उपमुखमंत्री अजित पवार यांनी दिला. 
पवार हे नगर परिषदेमध्ये वार्ताहरांशी बोलत हेाते. यावेळी आमदार भाउसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, पंचायत समिती सभापती दिपक पटारे ,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,नगरसेवक राजेद्र पवार, अ‍ॅड.सतोष कांबळे, अल्तमश पटेल ,अ‍ॅड.विजय बनकर,मुख्याधिकारी सुंमत मोरे, यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, चांगले काम झाल्याने जनतेने आम्हाला मतदान केले. त्यामुळे पंधरा वर्षे राज्यात आघाडी सरकारने काम केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, जनता पक्षाप्रमाणे मोदी यांची लाट होती. त्याचा परिणाम भाजपाला सत्ता मिळाली. लोकाशाही मार्गाने तुम्ही जिंकलात ते ठिक असले तरी आता अडीच वर्षे झाली. किती दिवस विरोधकांच्या नावाने बोटे मोडणार, त्यांच्या नावाने पावत्या फाडणार? असा सवाल पवार यांनी केला.
कांदा तुरीची काय अवस्था आहे. त्यावर झालेला खर्चही निघत नाही. कर्जापायी राज्यातील शेतकरी, त्याची पत्नी, मुले-मुली आत्महत्या करीत आहेत. ही बाब सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. शेतकरी ताठ मानेने जगला पहिजे यासाठी त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, त्यांना कर्ममाफी मिळाली पाहिजे, म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर धर्मनिरपेक्ष, पुरोगामी व समविचारी पक्षांनी एकत्र येत राज्यात संघर्ष यात्रा काढली. त्यात कोणतेही राजकारण नाही अथवा कोणाच्या फायद्यासाठी एकत्र आलेलो नाही. केवळ शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युपीए सरकारने 71 हजार कोटीची कर्जमाफी करून शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. आता पुन्हा ती वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने 30 हजार पाचशे कोटीचे कर्ज माफ करून शेतकरी कर्जमुक्त करावा, 19 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी आमची स्पष्ट भुमिका आहे. तसे न करता संघर्ष यात्रेवर टिका केली जात आहे. आता संवाद यात्रा काढून 25 लाख शेतकर्‍यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. याचाच अर्थ तुमचा जनतेशी संवाद नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे पवार म्हणाले.