Breaking News

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू - नागवडे

अहमदनगर, दि. 28 - राज्याचा विचार करता जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर अतिशय कमी आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या कामी अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्वाचे आहे. अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी दिली. 
तालुक्यातील वांगदरी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सहयोगातून ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रम व आंगणवडी मदतनीस-सेविका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून नागवडे बोलत होत्या. सरपंच कमल सोनलकर, सुरेखा लकडे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शांताबाई गोरे, तालुकाध्यक्ष सोनाली शिंदे आदी उपस्थित होते.  अनुराधा नागवडे म्हणाल्या, बदलत्या काळाबरोबर महिलांवरील जबाबदार्‍या वाढल्या आहेत. अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न बर्‍याच काळापासून प्रलंबित आहेत. महिला व अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना भेटणार असल्याचे सभापती अनुराधा नागवडे यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना नागवडे म्हणाल्या, विधवा महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबत जिल्हा परिषदेच्या माँध्यमातून काम करू. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ, अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याच्या मागण्या आग्रहीपणे मांडण्याचे आश्‍वासन अनुराधा नागवडे यांनी यावेळी दिले.
पंचायत समितीच्या उपसभापती प्रतिभा झिटे म्हणाल्या, श्रीगोंद्यात मुलींचा जन्मदर अत्यल्प आहे. ही बाब चिंताजनक असून स्त्रीभ्रूणहत्या टाळून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे.