Breaking News

तुडुंब भरलेलं उजनी शून्य टक्क्यांवर, शेतकरी चिंतेत

सोलापूर, दि. 28 - सलग दोन वर्षांच्या भीषण दुष्काळानंतर तुडुंब भरलेलं उजनी धरण वजा पातळीत गेलं आहे. केवळ सहा महिन्यातच जवळपास 59 टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने आता पावसाळ्यापर्यंत टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली. मात्र यंदा पाण्याचं नियोजन कोलमडल्याने 28 एप्रिललाच धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यांवर गेली.
उजनी धारण 117 टीएमसी क्षमतेचं आहे. या धरणाच्या जिवंत साठ्यात 53. 57 टीएमसी, तर मृत साठ्यात 63.65 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. प्रशासनाने फ्लॅपची उंची वाढवून पाणी क्षमता 123 टीएमसीपर्यंत वाढवली असली तरी यंदा नियोजनाचेच तीन तेरा वाजल्याने धरण वजा पातळीत पोहोचलं आहे. एकट्या सोलापूर शहरासाठी दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र साठवणूक क्षमता आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने एकट्या सोलापूर शहरासाठी 20 ते 22 टीएमसी पाणी वाया जातं. सोलापूर शहरासाठी नदीद्वारे पाणी सोडावं लागतं. वर्षभरातून चार ते पाच वेळा हे पाणी सोडलं जातं. मात्र नदीतून पाणी सोडताना पाण्याची मोठी नासाडी होते. ही नदी कर्नाटक राज्यातून जाते. त्यामुळे तेथील शेतकरीही या पाण्याचा फायदा घेतात. परिणामी सोलापूरपर्यंत हक्काचं पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही.