Breaking News

सातारा जिल्हा राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) :  अवघ्या 11 महिन्यात 52 हजार शौचालये पूर्ण करुन सातारा जिल्हा परिषदेने राज्य शासनाने दिलेले आव्हान समर्थपणे पेलले. जिल्ह्यातील 1490 ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारी मुक्त घोषित करुन, राज्यातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला घोषित करण्यात आले.
प्रधानमंत्र्यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारी मुक्तीच्या चळवळीत सातारा जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 1 हजार 490 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. ‘घर तेथे शौचालय’ या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच शालेय अंगणवाडी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्वपूर्ण घटक आहेत.
जून 2016 मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते. सातारा जिल्हा परिषदेने 52 हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या 11 महिन्यातच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचयातींची बाबनिहाय तपासणी करुन त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणार्‍या 46 त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती. या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची 27 मार्च 2017 अखेर तपासणी पूर्ण करुन राज्य शासनास अहवाल सादर केला. 24 एप्रिल 2017 रोजी या अहवालावरुन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सातारा जिल्ह्यातील 1 हजार 490 ग्रामपंचायती पडताळणी अखेर हागणदारी मुक्त घोषित करुन सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
़सातारा जिल्ह्यातील प्रसार माध्यमांनी या चळवळीत सकारात्मक भूमिका घेत प्रचार व प्रसिध्दीची धुरा प्रभावीपणे राबविली. जिल्हा व तालुकास्तरीय तज्ज्ञ चमुचा सुयोग्य वापर करुन या चळवळीला वेग राखण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच जनता या सर्वांचे प्रभावी प्रयत्न व सहभाग या बाबीसाठी उपयुक्त ठरल्या आहेत.
सातारा जिल्ह्याने नेहमीच पथदर्शी उपक्रम राबवून राज्याला मार्गदर्शकाची भूमिका बजावली. स्वच्छ भारत मिशनच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशनची टीम, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, प्रसार माध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश प्राप्त झाले आहे. या पुढे जिल्ह्यात स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्याचे काम जबाबदारीने पार पाडेल. या कार्यात पदाधिकार्‍यांचा  सातत्यपूर्ण सहभाग राहील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
 जिल्हा परिषद सातारा यांनी हाती घेतलेली चळवळ हागणदारी मुक्त होईपर्यंत थांबविली जाणार नाही. यापुढेही प्राधान्याने घनकचरा व सांडपाणी या घटकांवर काम केले जाईल. कचर्‍याचे संकलन, वर्गीकरण आणि वहन व व्यवस्थापन याद्वारे सातारा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.