Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कोतूळ येथील परिषद संस्मरणीय- रोहम

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 28 - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समाजजागृतीसाठी कोतुळ येथील झालेली परिषद ऐतिहासिक होती. असे प्रतिपादन दलित चळवळीचे मार्गदर्शक सुधाकरराव रोहम यांनी केले.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शी भूमी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दलित मित्र धर्माजी साळवे, साहित्यीक डॉ. मिलींद कसबे, अ‍ॅड. संघराज रुपवते, रविंद्र देशमुख, विजयराव वाकचौरे, रमेशराव देशमुख, साळवे गुरुजी, पोपटराव सोनवणे, सुरेश देठे, गौतम पवार, राजेंद्र घायवट, अशोक गायकवाड आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
सुधाकरराव रोहम पुढे बोलतांना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा विडा उचलला असतांना अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या परिषदा आयोजित करुन त्यांनी समाज जागृती केली. आमचे वडील माजी आमदार दादासाहेब रोहम यांच्या पुढाकाराने या परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. हा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा म्हणून त्यांनी मागील घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, समाज परिवर्तनासाठी विविध समाजाला एकत्रित घेवून ही चळवळ पुढे नेली पाहिजे. यासाठी कोतुळ या अतिशय दुर्गम भागामध्ये भाऊदाजी देशमुख सारख्या स्पृष्य समाजातील परिवर्तनवादी कार्यकर्त्याला बरोबर घेवून त्यांनी कोतुळ येथील परिषद सर्व समाजाला बरोबर घेवून यशस्वी केली. पी. जे. रोहम यांच्या संपर्कात असणारे भाऊदाजी देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वत:च्या घरात नेवून चोपाळ्यावर बसवून त्यांचा यथोचित गौरव केला व दलित चवळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊदाजी व रोहम साहेबांच्या आग्रहाखातर कोतुळ येथे  ही परिषद संपन्न केली. हा इतिहास आपण विसरता कामा नये. 75 वर्षापूर्वी समाज परिवर्तनाची ही चळवळ कोतुळ येथून सुरु झाली. संगमनेर तालुक्यातील पानोडीचे सरदार थोरात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेष स्नेह होता. याचेही विश्‍लेषण करतांना रोहम यांनी सांगितले,  सरदार थोरात व पी. जे. रोहम यांची मैत्री होती. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना निष्णांत वकीलाची आवश्यकता होती. रोहम यांच्या सुचनेवरुन डॉ. बाबासाहेबांनी सरदार थोरात यांचे वकीलपत्र घेवून त्यांना न्याय मिळवून दिला. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड व पानोडीचे सरदार थोरात यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. डॉ. बाबासाहेब व सयाजीराव गायकवाड यांचे नाते तर सर्वांना माहित आहेच. पुढे या तिघांची घनिष्ठ मैत्री झाली. यातून नगर, नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारच्या परिषदा झाल्या.  यातून समाज परिवर्तनाची मोठी चळवळ देशभर पसरली. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.