Breaking News

खंडित वीज पुरवठाप्रश्‍नी बोरगाव ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामस्थांना सातत्याने खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विजेबाबतच्या मागण्या त्वरित मार्गी न लागल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
बोरगाव येथे सतत वीजपुरवठा खंडित होतो. होणारा विजेचा पुरवठा हा अत्यंत कमी दाबाने होतो. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कित्येकदा लेखी निवेदने देऊनही त्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. त्या दृष्टीने गावठाण फिडरसाठी कायमस्वरुपी थ्री फेज वीजपुरवठा व्हावा, त्याचबरोबर वळसे येथील फिडरवरुन वीज मिळावी, शेतीपंपासाठी मंजूर करण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवण्यात यावेत, बोरगाव येथील वीज उपकेंद्र मंजूर व्हावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न केल्यास ग्रामस्थ उपोषण अथवा ’रास्ता रोको’ करणार आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. ऊर्जामंत्री, पालकमंत्री, सहपालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.