Breaking News

प्रेमप्रकरणातून युवतीची आत्महत्या

महाबळेश्‍वर, दि. 28 (प्रतिनिधी) : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नीलू कैलास लालबेग (वय 26) या युवतीचा मृतदेह शहरातील गवळी आळी येथील एका विहिरीत आढळून आला. नीलू हिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे. याला तिचा प्रियकर रवी शिंदे जबाबदार असून, त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व अनु. जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली.  
मुख्य बाजारपेठेजवळ असलेल्या गवळी आळी येथील तरुणी निलू लालबेग व तिचा प्रियकर रवि शिंदे हे एकाच ठिकाणी कामाला होते. तेथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, अशी लालबेग हिची इच्छा होती. परंतू रवीनेे आपण आंतरजातीय विवाह करू शकत नसल्याचे सांगून लग्नास नकार दिला होता. गेल्या आठवडाभरापासून नीलू निराश होती. चार दिवसांपूर्वी ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. तिचे चुलते धीरज लालबेग यांनी निलू बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, नीलू निघून गेल्याच्या चार दिवसानंतर गवळी आळी येथील विहीरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांना निलूचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचा दिसला. त्यानंतर परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने नीलूचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. नीलूच्या आत्महत्येला रवी शिंदे हा जबाबदार असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व अनु. जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. घटनेचा तपास सपोनि एम. बी. देशमुख व सहाय्यक फौजदार अशोक काशीद, हवालदार श्रीकांत कांबळे करत आहेत. मृत युवतीच्या मोबाईलमध्ये ती व तिच्या प्रियकराचे फोटो तसेच एसएमएस आढळून आले असून त्या आधारे पोलिसांनी तपास करत आहेत.