Breaking News

भंडारदर्‍यात मोबाईल नेटवर्कची सेवा खंडीत

। अकोले/प्रतिनिधी । 29 - भंडारदरा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. पंरतु याच भंडारदर्‍याच्या परिसरावर सर्वच मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कने वक्रदृष्टी केली आहे. त्यामुळे येणारा देशी, विदेशी पर्यटक हा भंडारदर्‍याच्या निसर्गसृष्टीवर भाळला जात असला तरी कोणत्याही कपंनीचे नेटवर्क उपलब्ध होत नसल्यामुळे त्याची सफर ही अधुरी राहील्यासारखी वाटत आहे.
भंडारदरा परिसर निसर्गाच्या विविध रुपांनी नटलेला आहे. या निसर्गाचा आविष्कार बघण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरासह महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक निसर्गप्रेमी भंडारदर्याला भेट देत असतात. या निसर्गप्रेमींनी भंडारदर्‍याच्या भूमीत पाय ठेवताच सर्वात अगोदर त्यांना एका समस्येचा सामना करावा लागतो तो म्हणजे मोबाईल नेटवर्कचा. या ठिकाणी अनेक कंपन्याचे मोठमोठे टॉवर उभारले गेलेत. पण या टॉवरद्वारे फक्त 2 जी चीच सेवा कंपन्यांच्या ग्राहकांना पुरवल्या जात आहे. ती सेवा पण अखंडीत अशी कधीच दिली जात नाही. कधी नेटवर्क गायब होईल याची श्‍वासती नसते. अनेक कंपन्या या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 2 जी, 3 जी, 4 जी अशा प्रकारच्या सेवा देत आहेत. जिओने अनेक ग्राहक काबीज केलेत, पण भंडारदर्‍यात जीव जायची वेळ येते पण कुठे जिओची रेंज मिळत नाही की कोणत्याही प्रायव्हेट कंपनीचे 3 जी, 4 जी मिळत नाही.
भारत सरकारची बीएसएनएलची सेवा भंडारदरा येथे उपलब्ध आहे पण त्यांच्या सेवेपुढे तर हात टेकायची वेळ आली आहे. कधी एखादा जेसीबी त्यांची वायर तोडील याचा नेम नाही तर कधी केबल चोरीला जाईल याचा भरवसा राहीलेला नाही. कधी कधी यांची वायर ही उंदरालाही आवडत असल्याने कधी तीचा ते फडशा पाडतील हे सांगता येत नाही. किती दिवस हा अन्याय भंडारदरावासिय सहन करणार आहेत. भंडारदर्‍याच्या रिंग रोडला अनेक प्रकारची पर्यटनाची आकर्षक अशी ठिकाणे आहेत. या रिंगरोडलाही नेटवर्कने दडी मारलीय. कुठंही फोन लागत नाहीत. एखादा अनर्थ घडला तर एखादी स्पेशल गाडी करून भंडारदरा गाठावं लागत. नेटवर्क उपलब्ध असेल तर काम करायची व पुढचा पल्ला गाठायचा असा दिनक्रम हा येणार्‍या पर्यटकाला व स्थानिक नागरिकांना करावा लागतो.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दररोज 1 जीबी डाटा अनेक कंपन्याकडून मोफत दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारची फ्री सेवा दिली जाते. भंडारदरा येथे मोठमोठ्या हॉटेल्सची बुकींग ही नेटवर्कचा प्रश्‍न सतावत असल्यामुळे अनेकदा रद्द करण्याची वेळ या हॉटेल व्यवस्थापनावर येते. भंडारदरावाल्यांना कमीत कमी आहे ती सेवा तरी चांगली देण्याची वाट जनता मागतेय. या भागात आदिवासी जनता असून त्यांची चक्क फसवणूक ही बीएसएनएल कंपनी व इतर खाजगी कंपनी करत आहेत. 3 जी, 4 जी असा इंटरनेटचा बॅलन्स मारुनही सेवा ही फक्त 2 जी चीच मिळते. मग ही फसवणूक नाही तर काय आहे. आता तरी सरकारी व खाजगी कंपन्यांनी जागे होवून आहे ती सव्र्हीस तरी चांगली द्यावी व ग्रामीण जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत.
भंडारदरा येथे वेगवेगळ्या कपंन्याचे बॅलन्स टाकणारे व्यापारीही या नेटवर्कला वैतागली आहेत. त्यासुद्धा ही नेटवर्क सेवा सुरळीत झाली नाही. तर बॅलन्स व व्हाऊचर विक्री बंद करून बेमुदत संपावर जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.