Breaking News

शेतकरी प्रश्‍नी ग्रामसभेत ठराव करा आमदार वैभवराव पिचड यांचे आवाहन

। अकोले/प्रतिनिधी । 29 - राज्यातील भाजपा शिवसेना सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. शेतकर्‍यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. शेतकरी कर्ज बाजारी झाला असुन तो आत्महत्या करीत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन व आपआपल्या विभागातील विविध प्रश्‍नांबाबत तालुक्यातील व मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतीने 1 मे 2017 रोजी होणार्‍या ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन आ.वैभवराव पिचड यांनी केले.
त्यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये 1 मे 2017 रोजी होणार्‍या ग्रामसभेत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी करुन त्यांचा 7/12 उत्तारा कोरा करावा, शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज पुरवठा व्हावा, शेतकर्‍यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबावजणी करावी, या महत्वाच्या विषयांचे ठराव करण्यास सांगितलेले असुन या ठरावा बरोबरच आढळा परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी पाण्याचा कायमचा प्रश्‍न सुटावा यासाठी बिताका प्रकल्पास निधी मिळणेबाबत ठराव करावा. तसेच प्रवरा परिसरातील ग्रामपंचायतीनी निळवंडे प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत व उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने निधी देवून कामे पूर्ण करण्याबाबत ठराव करावेत. त्याचप्रमाणे मुळा परिसरातील ग्रामपंचायतीनी पिंपळगाव खांड प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत, कोतुळ पुल निर्मितीसाठी निधी मिळणेबाबत व बेलापूर 33 केव्हीए वीज उपकेंद्र मंजुर होणेबाबतचे ठराव करावेत. आणि आदिवासीं परिसरातील ग्रामपंचायतीनी राजूर ते पिंपरकणे उड्डाणपूलासाठी निधी देवून तातडीने काम पूर्ण होणेबाबत, शेलविहीरे 33 केव्हीए वीज उपकेंद्र मंजुर होणेबाबत आणि पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत ठराव करुन या सर्व ठरावांच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री अहमदनगर, जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसीलदार अकोले  यांना देण्यात यावे असे आवाहन आमदार पिचड यांनी केले.