Breaking News

श्री संत नारायण महाराज पुण्यतिथी सोहळा - महंत आदिनाथ महाराज

अहमदनगर, दि. 27 - श्री संत नारायण महाराजांच्या सहाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र तारकेश्‍वर गड येथे शनिवार  व रविवार दि. 6 व 7 मे रोजी महाभिषेक, पादुका पुजन, समाधी पुजन, दर्शन सोहळा, प्रवचन, भजन, किर्तन, हरिपाठ, हरिजागर व महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री क्षेत्र तारकेश्‍वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी दिली. 
वैशाख शुद्ध 11, मोहिनी एकादशी, शनिवार दि.6 मे रोजी सकाळी श्री संत नारायण महाराज, श्री तारकेश्‍वर, श्री.विठ्ठल रुक्मिणी च्या मुर्तीस गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते महाभिषेक, पादुका पुजन व समाधी पुजन होणार आहे. त्यांनतर श्री संत नारायण महाराज समाधी दर्शन सोहळा सुरु होईल. पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या भाविक भक्तसाठी एकादशी निमित्त खिचडी फराळ, महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 सामुहिक हरिपाठ व रात्री 8 वाजता श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथील ह.भ.प.उल्हास महाराज सुर्यवंशी  यांचे हरिकिर्तन व त्यानंतर हरिजागर होणार आहे, वैशाख शुद्ध 12, रविवार दि.7 मे रोजी सकाळी महापुजा व त्यानंतर सकाळी 10 वाजता ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर (पंढरपूर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
श्री संत नारायण महाराजांचा भक्त परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दरवर्षी श्री क्षेत्र तारकेश्‍वर गडावर दर्शनासाठी येतो. या भक्तांसाठी दर्शन, फराळ, महाप्रसाद, पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात.
पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त देवस्थान परिसराची संपुर्ण स्वच्छता करण्यात आली असून नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री तारकेश्‍वर मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली आहे.