Breaking News

आपल्या कामात आनंद शोधणारी माणसे यशस्वी होतात - डॉ. मालपाणी

संगमनेर (प्रतिनिधी, दि. 27 - आपल्या वाट्याला आलेले काम ओझे न समजता ते आनंदाने करणारी आणि इतरांनाही आनंद देणारी माणसे जीवनात यशस्वी होतात. त्यांना सर्वांच्या हृदयात हक्काची जागा मिळते असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या कर्मचार्‍यांचा सन्मान सोहळा ‘चेअरमन अ‍ॅवॉर्डस् नाईट’ मालपाणी क्लब अ‍ॅण्ड रिसोर्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘मजा आना चाहिये’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. यावेळी बँकेचे चेअरमन प्रकाश राठी, व्हाईस चेअरमन गुरुनाथ बाप्ते, राजेंद्र वाकचौरे, सतीश लाहोटी,राजेश मालपाणी, दिलीप पारख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर सूरम, सहसरव्यवस्थापक विजय बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात मालपाणी यांनी विविध विनोदी किस्से, कविता, दैनंदिन जीवनातील मजेशीर अनुभव सांगत त्यांनी हसत खेळत जगण्याचा मूलमंत्र  श्रोत्यांना दिला. श्रोत्यांमधून क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे उडविणारे व्याख्यान श्रोत्यांना अंतर्मुख करणारेही ठरले.
आपल्या वाट्याला आलेले काम ओझे वाटू देऊ नका. त्यात आनंद शोधा. हसरी माणसे सर्वांना आवडतात. आनंदाने सेवा पुरविणार्‍या संस्थांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. आनंदी आणि उत्साही राहून स्वतःची कौशल्ये आणि क्षमता वाढविणे हे स्पर्धात्मक युगात गरजेचे आहे. तुम्ही ग्राहकांचे जितके भले करीत रहाल तितका तुम्हाला नक्कीच लाभ होईल. आळस, द्वेष, मनातील अढी, अहंकार या आतल्या शत्रूंवर मात करा. स्नेहश्रीमंत व्हा असे डॉ. मालपाणी म्हणाले. आपल्या आजूबाजूला किती नमुनेदार स्वभावाची माणसे असतात यावर त्यांनी ऐकवलेल्या विनोदी कविता श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेल्या.
बँकेचे शिपाई गणेश डफेदार, सिन्नर शाखेचे व्यवस्थापक विजेंद्रसिंग टिळे आणि सहकारी, अकोले शाखेचे व्यवस्थापक कैलास भुतडा आणि सहकारी राहाता शाखेच्या सोनाली झरेकर तसेच वसुली पथकातील ज्येष्ठ संचालक दिलीप पारख यांच्यासह बजाज, उल्हास हासे, योगिता सस्कर, राकेश गुंजाळ, संदीप दरेकर आदींचा डॉ. मालपाणी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी यांनी आपल्या भाषणातून प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून उपस्थित कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. आपल्याकडे काय आहे आणि भविष्यात काय मिळवायचे आहे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक संधी आपली वाट पहात आहेत. प्रत्येक कर्मचार्‍याने गुणवत्तेने ‘स्टार’ कर्मचारी व्हावे असे ते म्हणाले.
कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यक्षमतेचा उल्लेख करतांना बँकेचे चेअरमन प्रकाश राठी यांनी सांगितले, आनंददायी बँकिंग हे सूत्र आपल्याला मर्चंटस् बँकेच्या माध्यमातून समाजाला द्यायचे आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर सूरम यांनी प्रास्ताविकात रिझर्व बँकेने चाकण आणि नाशिक येथील शाखांना परवानगी दिल्याचे यावेळी जाहीर केले. ज्येष्ठ संचालक आणि थकबाकी वसुलीची धुरा वाहणारे दिलीप पारख यांनी आगामी वर्षात एन.पी.ए शून्य टक्के आणण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. डॉ. मालपाणी यांचा सत्कार प्रकाश राठी यांच्या हस्ते करण्यात आला. गुरुनाथ बाप्ते यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र पाटील यांनी केले.