Breaking News

मुदत संपूनही पैसा मिळत नसल्याने ठेवीदारांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी, दि. 27 - ठेवी ठेवल्याच्या पावत्यांची मुदत संपून  चार ते पाच महिने उलटून गेले तरी देखील ठेवीदारांना पैसे मिळत नाही. पतसंस्थेच्या संचालकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ठेवीदारांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत उपनिबंदक यांना दिलेल्या निवेदनात ठेवीदारांनी म्हटले आहे, तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार असून गेले सहा महिन्यांपासून आमचे ठेवींची मुदत संपली आहे. आम्ही वारंवार संस्थेकडे आमचे पैशाची मागणी करत आहोत. परंतु संस्था पैसे देण्यास टाळाटाळ  करत आहे. याबाबत आम्ही आपणास 20 मार्च रोजी रजिस्टर नोटीस पाठवली होती. परंतू उद्यापही आम्हा सर्व खातेदारांना आमची ठेवीची रक्कम मिळालेली नाही. सदरचे कामी आपणाकडून संस्थेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आम्हाला आपणांकडून आजवर केवळ तोंडी हमी दिलेली आहे. त्याबाबत कोणतीही लेखी हमी आम्हाला देण्यात आलेली नाही अगर आमची ठेवीची रक्कम मिळणेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याउलट संस्थेच्या संचालकांकडून आम्हा ठेवीदारांना धमक्या दिल्या जातात. संस्थेकडून ठेवीची रक्कम 28 एप्रिलपर्यंत न मिळाल्यास 29 एप्रिल पासून आपले कार्यालयाच्या दालनात बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर भिमराज जाधव, गणपत हजारे, विकास पवार, बबन फालके, अमोल रासणे, जयसिंत शिंदे, बाळशिराम डोमाळे, पंढरीनाथ डोमाळे, भिकाजी जाधव, सौ. ललिता जाधव, सुयोग जाधव आदींच्या सह्या आहेत.