Breaking News

रोटरी संडे सायन्स स्कुलच्यावतीने तीन दिवशीय रोबोटीक कार्यशाळेचे आयोजन

संगमनेर (प्रतिनिधी, दि. 27 - उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला व डोक्याला चालना मिळावी या उद्देशाने येथील रोटरी क्लब संचलीत रोटरी संडे सायन्स स्कूलतर्फे तीन दिवसीय रोबोटीक्स-तंत्र व मंत्र या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 6, 7 व 8 मे रोजी करण्यात आले असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष सुनील कडलग व प्रकल्पप्रमुख पवनकुमार वर्मा यांना दिली.
विज्ञान हा विषय केवळ पुस्तकांतून शिकविण्यापेक्षा त्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून केल्यास विद्यार्थ्यांना निर्मितीचा आनंद तर मिळेलच शिवाय त्यांच्यामध्ये वैज्ञानिकदृष्टी निर्माण होईल. विद्यार्थ्यांमधून बालशास्त्रज्ञ निर्माण झाल्यास सामर्थ्यसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल या उद्देशाने रोटरी क्लबने गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथील संडे सायन्स स्कूलच्या सहकार्याने येथे रोटरी संडे सायन्स स्कूल हा प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पाला विद्यार्थी व पालकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून रोटरीने उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन दिवशीय रोबोटीक्स-तंत्र व मंत्र या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत रोबोटचे तंत्र, प्रकार व उपयोजन आदी मूलभूत संकल्पना समजावून घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे रोबोट बनविणार आहे. रोबो रेसर, फरशी पुसणारा रोबो, फ्लोअर क्लिनर रोबो, काच पुसणारा ग्लास क्लिनर रोबो विद्यार्थी बनविणार आहेत. या शिवाय या रोबो रेसरची शर्यतसुद्धा घेतली जाणार आहे. दररोज तीन तासाप्रमाणे तीन दिवशीय रोबोटिक्स कार्यशाळेत या क्षेत्रात उपलब्ध असणार्‍या संधी, करीअर या क्षेत्रात भविष्यकाळात पुढे जाणार्‍यासाठीचे मार्गदर्शन रोटरी संडे सायन्स स्कूलचे डायरेक्टर प्रा.शरद तुपविहीरे करणार आहेत. रोबोटीक्स-तंत्र व मंत्र या कार्यशाळेत सहभाग घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांला रोबोट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य रोटरी क्लबतर्फे पुरविले जाणार असून तयार केलेला रोबो घरी घेवून जाता येणार आहे. कार्यशाळेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
एकविसावे शतक हे विज्ञानाचे शतक आहे. अनेक क्षेत्रात काम करण्यासाठी माणसे मिळत नसल्याने घरकामासाठी रोबोटचा वापर घेण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्यामुळे रोबोटिक्स क्षेत्रात करीअरच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेद्वारे रोबोटिक्स विषयी आवड निर्माण व्हावी, तंत्र व मंत्रही शिकता यावेत यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल असे रोटरी क्लबचे सचिव साईनाथ साबळे यांनी सांंगितले. दिनांक 6, 7 व 8 मे रोजी, सकाळी 8 ते 11 या वेळेत ही कार्यशाळा रोटरी क्लब संचलित दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय हॉल, संगमनेर नगरपरिषद परिसर येथे होणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी डॉ.विकास करंजेकर व पवनकुमार वर्मा यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.