Breaking News

हुंड्यापायी मुलीची आत्महत्या चिंता वाढवणारी - माजी मंत्री पिचड

। अकोले/प्रतिनिधी । 29 - हुंड्यापायी बापाला मुलीचं लग्न करता येत नाही, म्हणून मुलगी आत्महत्या करते ही बाब आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी असून ‘हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही’ हा कार्यक्रम आता आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रीनेही स्वावलंबी बनले पाहिजे, असे मत राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले. 
आ. वैभवराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात पिचड बोलत होते. अकोले तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष व त्यांचे सर्व सेल, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे अकोले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा हेमलता पिचड होत्या. यावेळी जिल्हा बॅँकचे चेअरमन सिताराम गायकर, ए. टी. एस. अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव, महिला तालुका अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, तहसीलदार मनोज देशमुख उपस्थित होते.
पिचड म्हणाले की, पूर्वीच्या काळी महिला दुर्लक्षित होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर महिलांची प्रगती झाली नसती. त्यांनी खर्‍या अर्थाने स्त्रीयांना पुढे आणले. समाजाविरुध्द जाऊन त्या लढल्या. स्त्रीने शिक्षण घेऊ नये, असा प्रघात होता. पुरुषांची मक्तेदारी होती. अंधश्रध्दा, अनिष्ठ रुढी- परंपरा यामुळे महिलावर्ग हा उपेक्षित होता. अलीकडच्या काळात शरद पवारांसारखा एक दुरदृष्टीचा व पुरोगामी विचारांचा नेता पुढे आला आणि त्यांनी देशातले पहिले महिला धोरण महाराष्ट्रात राबविले. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम केले. 50 टक्के आरक्षण मिळवून दिले. ज्योतीबा फुलेंनी शेतकर्‍यांचे आसुड हे पुस्तक लिहिले. त्यात शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. त्या आजही त्याच आहेत. खाणारे विरुध्द पिकविणारे अशी लढाई सुरू आहे. शेतकर्‍यांना आज सरकारने वार्‍यावर सोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील पुरुष आत्महत्या करीत आहेत. बापाला हुंडा देता येत नाही म्हणून मुली आत्महत्या करीत आहेत. समाजाला हे एक आव्हान आहे. स्त्री भ्रुणहत्या थांबविल्या पाहिजे. एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित होते. आदिवासी समाजात मुलीकडून हुंडा घेण्याची पध्दत नाही. स्त्री ही संपत्ती मानली जाते. अडाणी- अशिक्षीत समाजातही अशा काही चांगल्या परंपरा आहेत. त्याचे शिक्षीत लोकांनी अनुकरण करायला हवे, असेही पिचड म्हणाले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला व्याख्यात्यांनी शासनाच्या विविध योजना, महिलंसाठीचा कायदा यावर व्याख्यान दिले. महिलांसाठीच्या योजनांच्या पुस्तीकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. स्वागत बादशहा ताजणे यांनी केले. तर प्रास्ताविक बाळा पवार यांनी केले. सुत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले. यावेळी जि. प. सदस्या माधवी जगधने, नगरसेविका किर्ती गायकवाड, शबाना शेख, रमेश गोडसे, प्रतिभा घुले, हेमलता चासकर, प्राचार्या मिना नवले, आबसाहेब देशमुख, भिमाशंकर तोरमल, मीनानाथ पांडे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, हिम्मत मोहिते, भरत घाणे आदी उपस्थित होते.