Breaking News

देशाच्या विकासात सहकार चळवळीचे मोठे योगदान- राज्यपाल विद्यासागर राव

संगमनेर तालुका दूध संघास सहकारनिष्ठ पुरस्कार प्रदान 

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 29 - भारतीय सहकार चळवळ जगातील सर्वांधिक जुनी चळवळ आहे. हीच चळवळ समाजाच्या विकासासाठी वरदान ठरली आहे. म्हणून या सहकार चळवळीला नवसंजीवणी देण्याची गरज असून देशाच्या विकासात सहकार चळवळीचे मोठे योगदान ठरले असल्याचे गौरोदगार राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले.
सहकार पणन व वस्त्रोउद्योग विभागाच्यावतीने सहकार क्षेत्रासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्कार सोहळ्यााप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, महापौर शोभा बनशेट्टी, अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, विभागीय आयुक्त दळवी, सहकार निबंधक आनंद जोगदंड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामपाल श्री विद्यासागर राव म्हणाले, देशाच्या विकासात सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. भारतातील सहकाराचे जाळे जगात सर्वात मोठे आहे. या सहकार चळवळीला शंभर वर्षाचा इतिहास आहे. ही चळवळ देशाला वरदान ठरली आहे. महात्मा गांधी, पंडीत नेहरु आदिंसह अनेक विचारवंत सहकार चळवळीचे पुरस्कर्ते होते. सध्या मात्र सहकाराचे चित्र विदारक होत चालले आहे.  सहकारी संस्थांची स्थिती फारशी चांगली नसल्याने शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सावकारी वाढली आहे. हीच सावकारशाही मोडीत काढण्यासाठी सहकारी संस्थांची संख्या वाढवून अधिकाधिक कर्जपुरवठा वाढवावा अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संगमनेर तालुका सहकारी दूध संघास राज्यपाल यांच्या हस्ते सहकारनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सभापती हरीभाऊ बागडे म्हणाले, सहकारी संस्थांनी खेड्यातील तळागळातील माणसांसाठी काम करावे. पारदर्शक कारभार करावा. गावचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. चांगले व नफ्यातील संस्थांनी आरोग्यकेंद्र उभारणीसाठी पुढे येवून समाजासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख पुरस्कार स्विकारतांना म्हणाले, संगमनेर दूध संघाची स्थापणा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1977 साली केली. स्वातंत्र्योत्तर काळात सहकार क्षेत्र हे गोर गरिब, कष्टकरी यांच्या जीवन विकासाचे साधन मानून अविरतपणे काम केले. सहकारात आर्थिक शिस्त रुजवितांना काटकसर, पारदर्शकता, गुणवत्ता, आधुनिकता यांचा उपयोग करुन विविध सहकारी संस्थांची स्थापना केली. माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या दूध संघाने राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे. तसचे संगमनेर दूध संघास हा सहकारनिष्ठ पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभारही मानले.
यावेळी बाजीराव खेमनर, साहेबराव गडाख, आर. बी. राहाणे, लक्ष्मणराव कुटे, सुभाष आहेर, गणपतराव सांगळे, मोहन करंजकर, भास्कर सिनारे, विलास वर्पे, गंगाधर चव्हाण, अ‍ॅड बाबासाहेब गायकर, विलास कवडे,  संतोष मांडेकर, आण्णा राहिंज, पांडुरंग सागर, माणिक मादव, सौ.प्रतिभा जोंधळे, सौ. ताराबाई धुळगंड,  राजेंद्र चकोर, सोमनाथ जोंधळे, रेवजी धुळगंड, कार्यकारी संचालक प्रतापराव उबाळे, सहाय्यक निबंधक श्री. भांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.