Breaking News

सातारा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : सातारा शहराला पाणी पुरवठा केल्या जाणार्‍या जलस्त्रोतातील साठा घटू लागल्याने तसेच शहापूर योजनेला तांत्रिक बिघाड झाला असल्याने शहरात काही दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली. दरम्यान, पालिकेला आवश्यकता वाटल्यास पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. शहापूर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे सातारा शहरात काही दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. बुधवार, दि. 26 रोजी शहापूर माध्यमातून पाणीपुरवठा होणार आहे तर कास माध्यमातून होणार नाही. गुरुवार, दि. 27 रोजी कासमधून होणार आहे तर शहापूरमधून होणार नाही. शुक्रवार, दि. 28 रोजी शहापूर, शनिवार दि. 29 रोजी कास तर रविवार, दि. 30 रोजी शहापूरमधून पाणीपुरवठा होणार आहे. ज्यादिवशी शहापूरमधून होणार आहे, त्यादिवशी कासमधून पाणीपुरवठा होणार नाही तर ज्यादिवशी कासमधून होणार आहे, त्यादिवशी शहापूर योजनेतून पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे सातारकरांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकावर नगराध्यक्षा माधवी कदम आणि पाणीपुरवठा समिती सभापती सुहास राजेशिर्के यांच्या सह्या आहेत.