Breaking News

पोलीस भरतीला गेलेला युवक गजाआड

कराड, दि. 27 (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी गेलेल्या युवकाचा मोटारसायकल चोरीत सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी  पाटण तालुक्यातील माजगाव येथील संशयित युवकास कराड शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्या कराडमधील आकाराम ऊर्फ सोन्या चव्हाण (रा. माजगाव, ता. पाटण), अश्पाक मुजावर, सूरज पालेकर, (रा. कराड) या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कराड शहर परिसरात मोटारसायकलीच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शहरात काही दिवसांपासून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. यावेळी पोलिसांना मोटारसायकल चोरीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करत कराडमधील सूरज पालेकर व अश्पाक मुजावर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कराडातून काही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
चोरीप्रकरणात माजगाव येथील आकाराम ऊर्फ सोन्या याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. सोन्या हा पोलीस भरतीसाठी मुंबईला गेला असल्याचे पोलीस पथकाला समजल्यानंतर सोन्याच्या शोधार्थ पथक मुंबईला पोहोचले. तेथून त्याला ताब्यात घेऊन कराडात आणले असता चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरल्याची कबूली दिली. सोन्या, सूरज व अश्पाक या तिघांनी कराडातून चार-पाच मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरलेल्या मोटारसायकल ते स्वत: वापरत होते. तर दोन मोटारसायकली त्यांनी लपवून ठेवल्या होत्या. सोन्या पोलीस भरती होण्याची शक्यता असताना पोलिसांनी त्याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व हवालदार सतीश जाधव अधिक तपास करत आहेत.