Breaking News

तारळी नदीत पोहायला गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

उंब्रज, दि. 27 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील उंब्रज येथील कृष्णा व तारळी नदीच्या संगमावर पोहण्यास गेलेल्या लहान सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने उंब्रजसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रूद्र राजेंद्र कुराडे (वय 7) आणि बाबू राजेंद्र कुराडे (वय 5, रा. उंब्रज, ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. 
येथील जयविजय चौकात राहणार्‍या कुराडे कुटुंबातील रूद्र आणि बाबू हे दोघे सख्ये भाऊ आणि त्यांच्यासमवेत अन्य एक मुलगा असे तिघेजण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीपात्रात पोहण्यास गेले होते. यावेळी रूद्र आणि बाबू हे दोघे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले तर त्यांच्यासोबत असणारा मुलगा नदी कडेला थांबला होता. काही वेळात नदी पात्रातील रूद्र व बाबू हे दोघे पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून घराकडे धाव घेऊन रूद्र व बाबू नदी पात्रात बुडत असल्याची माहिती दिली. यावेळी घरातील व शेजारी असणार्‍या नागरिकांनी तत्काळ नदीकाठी धाव घेऊन शोध मोहीम राबविली. सुमारे अर्ध्या तासानंतर दोघे भाऊ नदी पात्रातील एका खड्यात सापडले. याठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मुलांना नदी पात्रातून बाहेर काढताच एक मुलगा जागीच मयत झाला होता तर एक मुलगा जिवंत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत मुलांचे वडील ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. तर आई मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करते. दोन्ही मुले शाळेत जात नसली तरी यावर्षी यातील एका मुलास त्याची आजी पुणे येथे बोर्डींगमध्ये टाकवणार होती. दोन्ही बालकांवर रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.