Breaking News

धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याचा आज शुभारंभ

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : धोम बलकवडी प्रकल्पातील उजवा कालवा कि. मी. 140 मधील अंतिम टप्प्यातील कालव्याच्या कामाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते गुरुवार, दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. मौजे मरढे (पोकळेवाडा), ता. फलटण, जि. सातारा येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य, रामराजे नाईक-निंबाळकर हे राहणार आहेत. याप्रसंगी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, पदुम मंत्री महादेव जानकर, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांचीही उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती धोम-बलकवडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बलकवडी या गावाजवळ धोम बलकवडी धरण आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 4.08 टिएमसी इतका असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र निरा खोर्‍यामध्ये आहे. जून 2007 पासून धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठी पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील 4300 हेक्टर, फलटण तालुक्यातील 12 हजार 750 हेक्टर असे एकूण 18 हजार 100 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील उळुंब, गोळेवाडी, गोळेगांव व जोर या 4 गावांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. धोम बलकवडी उजवा कालवा कि. मी. 92 पर्यंतची वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहेत तर कि. मी. 93 ते 130 मधील कामे प्रगतीपथावर आहेत. दुष्काळी भागासाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडून लाभ क्षेत्रातील पाझर तलाव, ग्राम तलाव भरुन देण्यात येत आहे.
मार्च 2017 अखेर 10153 हे. सिंचन निर्मिती झाली असून 10 हजार 700 हे. क्षत्र सिंचीत करण्यात आले आहे. उन्हाळ हंगाम सन 2016-17 मध्ये फलटण तालुक्यातील सावंतवाडा, दर्‍याचीवाडी, जाधव नगर, गिरवी, निरगुडी, विंचुर्णी, सासकल, वेळोशी, तरडफ, उपळवे, वाघोशी, गुरवदरा, जननीमळा, काटेवाडी, खंडोबा तलाव, दालवडी, बिबी या गावांना पाणी देण्यात आले आहे, अशी माहिती वि. बा. जाधव, कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई यांनी दिली आहे.