भारती विद्यापीठ पोलिसांकडून पंधरा लाखांच्या जुन्या नोटा जप्त
पुणे, दि. 04 - चलनातून रद्द झालेल्या हजार रुपयांच्या पंधरा लाख रुपयांच्या नोटा भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही रक्कम बदली करुन घेण्यासाठी आणण्यात आली होती. दरम्यान, जप्त केलेल्या रकमेवर पुढील कारवाईसाठी प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले आहे. गणेश रामचंद्र मोरे (वय 27, रा. शिळफाटे, ता. मावळ, जि. पुणे) आणि संतोष आबु मराठे (वय 34, रा. डोंगरगाव, ता. मावळ, जि. पुणे ) यांच्याकडे ही रक्कम आढळून आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक श्रीधर पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव- कात्रज रोडवर वंडरसिटी येथे दोन व्यक्ती थांबल्या असून, त्यांच्याकडे जुन्या हजार रुपयांच्या नोटा असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे वडगाव -कात्रज रस्यावरील वंडर सिटी शेजारील हॉटेल अन्नपूर्णा येथे सापळा रचून वरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे हजार रुपयांची 15 बंडल आढळून आली. दरम्यान, ही रक्कम एक वर्षापूर्वी केलेल्या जमीन विक्रीतून मिळाली असल्याचे गणेश मोरे याने चौकशीत सांगितले आहे. तसेच ही रक्कम आपण आई वडिलांपासून लपवून ठेवली होती. यातील रक्कमेपैकी 25 टक्के कमिशन घेऊन एक व्यक्ती आपल्याला नोटा बदलून देणार होता, असे मोरे याने पोलिसांना सांगितले.