Breaking News

पाणी बचत हीच पाणी निर्मीती- आ. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 24 -  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्यावतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असून शहरात येणार्‍या नागरिक व महिलांसाठी स्वच्छ व भरपूर पाणी मिळावे यासाठी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाणी बचत करावी असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या समोर पाणपोईचा शुभारंभ झाला. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, संपतदिघे, प्रकाश कडलग, बाळासाहेब चौधरी, रमेश मंडलीक, दिनकर वाळे, हरिभाऊ कर्पे, मोहन पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. थोरात म्हणाले, राज्यात सध्या दुष्काळामुळे गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये एकदिलाने दुष्काळावर मात करण्यासाठी काम सुरु आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेने सुरु केलेल्या पाणपोईमुळे खेड्यापाड्यातून येणार्‍या महिला, नागरिकांना पिण्यासाठी मोफत स्वच्छ पाणी मिळणार आहे. या संस्थेचा पाणपोई उपक्रम हा कौतुकास्पद ठरणार आहे. तालुक्यात इतरत्र ही विविध सेवाभावी संस्था पिण्याच्या पाण्याच्या टाक्या,टँकर पूरवत आहे. सर्व नागरिकांना या दुष्काळात पाण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे कारण पाणी बचत हीच पाणी निर्मिती ठरणार असल्याचे ही ते म्हणाले.
बाजीराव खेमनर म्हणाले, स्वच्छ व भरपूर पाणी पिण्यासाठी देण्याचा हा उपक्रम सुरु करुन या सेवाभावी संस्थेने जोपासली सार्वजनिक बांधीलकी कौतूकास्पद आहे. यावेळी बापूसाहेब गिरी म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेने यापूर्वी अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे यापुढे ही समाजकार्याचे काम सुरुच राहणार आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांसह सेवा सोसायट्यांचे सचिव व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.