Breaking News

शिवारात पडणारा पाऊस शिवारात जिरवा : ना. महादेव जानकर

सातारा, दि. 16 (प्रतिनिधी) : शिवारात पडणारा पाऊस शिवारात अडवून तो शिवारात जिरविला पाहिजे. त्याशिवाय गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाहीत. यासाठी गावातील प्रत्येकाने श्रमदान करुन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करा, शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
माण तालुक्यातील वडगाव या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पदुम मंत्री जानकर यांनी वडगाव येथे जावून श्रमदान केले. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे, सरपंच निलम अवघडे, उपसरपंच नितीन उंबासे, ग्रामसेवक सतीश भोसले, तलाठी दिलीप कोकरे, कृषी सहायक आर. बी. नरळे, अजित पवार, चंद्रकांत दडस, बाळासाहेब शिंदे, नितीन उंबासे, साहेबराव उंबासे, अजित जाधव, दादासाहेब उंबासे, सोमनाथ दडस, सुभाष ढमाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणमधील तरुण हे प्रशासकीय सेवेत मोठ्या पदांवर आहेत. त्यांची बैठक घेवून प्रत्येकाला एक एक गाव दत्तक घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे सांगून ना. जानकर  म्हणाले, उद्योगपतींशी चर्चा करुन या भागात मोठा उद्योग आणून तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरु केली आहे.
प्रत्येक शेतकर्‍यांनी शेततळी बांधून मत्स्य व्यवसाय करावा. त्यासाठी मत्स्य बीज व मत्स्य खाद्य पुरविले जाईल. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन करुन ते म्हणाले, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण आकाशालाही गवसणी घालू शकतो, हे तरुणांनी लक्षात ठेवून शेतीबरोबर शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे. माण तालुका कायम टंचाई भाग आहे. या भागातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त श्रमदान करुन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावीत.