Breaking News

भाजपचा सशक्तीकरण व गरीब कल्याण अभियानांतर्गत मेळावा

। अच्छे दिन’ नक्कीच येतील : आ. अपूर्व हिरे

नाशिक, दि. 16 - केंद्र व राज्यामध्ये असलेले भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आश्‍वासनक पद्धतीने विना भ्रष्टाचार वाटचाल करीत आहे. यामुळेच देशातील जनता त्यांच्यावर संपूर्णपणे विश्‍वास ठेवत आहे. केंद्र शासनाने कसमादेनांचे नारपार प्रकल्प, मनमाड - इंदूर रेल्वेमार्ग विविध राष्ट्रीय महामार्ग सारखे प्रलंबित प्रश्‍नासाठी मोठा निधी उपलब्ध करून विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. लवकरच अच्छे दिनचा अनुभव सर्वांना येईल असे प्रतिपादन आ. डॉ. अपुर्व हिरे यांनी येथे केले.
येथील मसगा महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या सशक्तीकरण व गरीब कल्याण अभियानातंर्गत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते सुरेशनाना निकम, जिल्हा बॅँक संचालक अद्वय हिरे, जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार, पं.स.सभापती प्रतिभा सुर्यवंशी, महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, नितीन पोफळे, धनाजी लगड, नगरसेवक निलेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. हिरे पुढे म्हणाले,
सुजलाम- सुफलाम भारत निर्मितीसाठी भाजपा शासनाने नदीजोड प्रकल्प सुरु केला आहे. जिल्हायासाठी 140 कोटी 70 लाख रुपयांचे जलयुक्त कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शेती सिंचनासाठी 10.687 कोटी रुपये मंजुर केले आहेत. यावेळी आ. हिरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडाडून टिका केली. महापालिका निवडणुकीत पश्‍चिम भागातील भाजपा सर्व 20 पैकी 20 जागा जिंकेल. असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मालेगाव महापालिकेवर भाजपाचा महापौर बसून भाजपाचाच झेंडा फडकेल असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी अद्वय हिरे, दीपक पवार, सुरेश निकम, सुनील गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.