Breaking News

महावितरण कंपनीच्या भांडारगृह परिसराला आग

कोरेगांव, दि. 16 (प्रतिनिधी) : कोरेगाव तालुक्यातील सातारारोड (ता. कोरेगाव) येथील महावितरण कंपनीच्या भांडारगृहाच्या आवारात अचानक लागलेल्या आगीत सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. पंधरा दिवसांमध्ये या परिसरात दुसर्‍यांदा आग लागल्याचा प्रकाराने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. महावितरण कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून उपकेंद्रातून दोन ते अडीच तास वीज पुरवठा बंद ठेवला होता.  
कोरेगाव तालुक्यातील सातारारोड-सातारा रस्त्यावर महावितरण कंपनीचे उपकेंद्र असून, तेथून जवळपास निम्म्या जिल्ह्याला वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्राजवळ कंपनीचे भांडारगृह असून, तेथे दुपारच्यावेळी अचानक आग लागली. भांडारगृहाच्या आवारात वाळलेले गवत व जमिनीवर पडलेला पालापाचोळा पेटला आणि क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. प्रसंगावधान राखत महावितरण कंपनीचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सातारा नगरपालिका, अजिंक्यतारा साखर कारखाना व वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.