Breaking News

दिल्ली महापालिकेवर भाजपचा झेंडा

आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसर्‍यांदा झेंडा

नवी दिल्ली, दि. 26 - दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल  जाहीर झाले असून, पुन्हा एकदा मोदी लाटेची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील तीनही महानगरपालिकेतील 270 पैकी 180 जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले आहे. यंदाची निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. भाजपला तिसर्‍यांदा सत्तेवर येण्याचे आव्हान होते, तर काँग्रेसमध्ये दिल्लीत पुनरागमन करण्याचा दबाव आहे. ‘आप’ ने विधानसभा निवडणुकीत जी जादू परसवली होती ती कायम ठेवणे हेच मोठे आव्हान होते. पण ते तेवढ्या पद्धतीने पेलताना दिसत नाही. देशभरातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा अश्‍वमेध रोखण्यात विरोधी पक्षांनी यश येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत भाजप, आप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत काटे की टक्कर होती. तिन्ही पक्षांसाठी ही महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई होती. पण या लढाईत भाजप अग्रेसर दिसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपला 180 जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसला मागे टाकत आप 45 जागांवर विजयी आहे. तर काँग्रेसने फक्त 35 जागांवर विजय मिळविला आहे. तर इतर 10 उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीत 272 वॉर्डपैकी दोन वॉर्डमधील उमेदवारांचे निधन झाल्याने या वॉर्डमधील निवडणुक प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे उर्वरित 270 वॉर्डसाठी 2537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील सर्वात जास्त उत्तर दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 1004 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दक्षिण दिल्लीतील 104 वॉर्डसाठी 985 आणि पूर्व दिल्लीतील 64 वॉर्डसाठी 548 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावी लागल्याने महापालिका निवडणुकीत काय होईल याकडे सर्वांचेच लक्ष आहे. तर दुसरीकडे 15 वर्षांपासून दिल्लीवर राज्य करणार्‍या काँग्रेससमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. तसेच आम आदमी पक्षांने विधानसभेप्रमाणे महापालिकाही काबिज करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांनी प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर आम आदमी पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार केला. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीत काँग्रेसची सर्व धूरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली होती. मोदी लाट आणि आम आदमी पक्षाचे आव्हान यामध्ये काँग्रेससमोर स्वत: चे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे.