Breaking News

पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेल्या लागेबांध्यामुळेच शहरात गुन्हेगारांची दहशत - श्रीरंग बारणे

पुणे, दि. 05 - पिंपरी-चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे, पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांशी गुन्हेगारांचे असलेले लागेबांधे तसेच शहरात गुन्हेगारी दहशत पसरविण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप  खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. याबाबत खासदार बारणे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना निवेदन देऊन पिंपरी-चिंचवड शहर भयमुक्त, गुन्हेगारी व अवैध धंदे मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी हा सर्वसामान्य जनतेसाठी चिंतेचा विषय झाला आहे. रोजचे वृत्तपत्र उघडल्यानंतर व सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच अशा अनेक घटना समोर येत आहेत. शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीबरोबरच अवैध धंदे, पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांशी गुन्हेगारांचे असलेले लागेबांधे, त्याचबरोबर राजकीय दबावाने प्रेरित होऊन काम करीत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यामुळे गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिला नाही. तडीपार केलेल्या अनेक गुंडांचा खुलेआम शहरात वावर आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना याची माहिती असूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर गुन्हेगारांचा व अवैध धंदे करणार्‍यांचा अड्डाच झाला आहे. यातूनच तरुण वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे झुकला जाऊ लागला आहे. शहरात गुन्हेगारी दहशत पसरविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. गाड्यांची तोडफोड करणे, गाड्या जाळणे, तरुण-तरुणींवरील हल्ले, सर्वसामान्य व्यापारी, छोटे व्यावसायिक यांच्याकडून हप्ते गोळा करणे त्यांच्यावर दहशत पसरविणे, असे प्रकार वाढले आहेत.
सर्वसामान्य माणूस पोलीस चौकीमध्ये तक्रार करण्यासाठी धजवत नाही, असे अनेक प्रकार घडतात त्याची नोंदही पोलीस ठाण्यात होत नाही. पोलीस रेकॉर्डवरती मात्र गुन्हे कमी आढळून येतात हा एक चिंतेचा विषय झाला आहे, असेही बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.