Breaking News

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण रस्ते बनविणार - ग्रामविकास राज्यमंत्री भुसे

अहमदनगर, दि. 28 - ग्रामीण भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते बनविण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करणार्‍या ठेकेदारांवर पाच वर्षे रस्त्यांच्या देखभालीचीही जबाबदारी टाकण्यात आली आहे. रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची पावले पडत आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
नगर तालुक्यातील भोरवाडी आणि पारनेर तालुक्यातील चौंभुत येथील मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ राज्यमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विजयराव औटी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
पारनेर तालुक्यातील चौंभुत येथे रेनवाडी- निघोज या मार्गावरील रेनवाडी-वडनेर बु. या 9.56 किलोमीटर लांबीच्या आणि पाच कोटी 23 लाख रुपये खर्चाच्या रस्ते बांधकामाचे भूमीपूजन श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. येत्या 12 महिन्यात हा रस्ता तयार करण्याचे उद्दिष्ट्य संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहे. या कामामुळे पारनेर तालुक्यातील रेनवाडी, चौंभुत, म्हस्केवाडी, वडनेर आदी गावांतील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी बोलताना राज्यमंत्री श्री. भुसे म्हणाले की, ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनही पुढाकार घेत आहे. पारनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासासाठी शासन कोठेही कमी पडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची राज्य शासनाची भुमिका असल्याचे यावेळी  त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात चांगले रस्ते बांधले तर त्याद्वारे विकासाची वाटचाल अधिक चांगल्या गतीने होईल, त्यामुळे नागरिकांनीही त्यांची जबाबदारी ओळखावी, चांगली कामे होतील, याकडे लक्ष द्यावे. विनाकारण रस्ते पूर्ण झाल्यानंतर रस्ते खोदाई टाळावी, असा सल्ला त्यांनी दिला.यावेळी आमदार श्री. औटी यांनीही आपल्या मनोगतात पारनेरच्या ग्रामीण भागात अधिकाधिक विकासकामे करण्यावर आपला भर असल्याचे सांगितले.