Breaking News

अभय महाजन यांची नगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती


अहमदनगर, दि. 28-नागपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त म्हणून कार्यरत असणार्‍या अभय महाजन यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान मावळते जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दुपारी आपल्या पदाची सूत्रे अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे सुपूर्त केली.यावेळी कवडे यांना कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.
अभय महाजन हे स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.विक्रीकर विभागातून 1992 मध्ये त्यांनी आपल्या सेवेला सुरूवात केली.विक्रीकर विभागातील आपल्या कार्यकाळात महाजन यांनी सहाय्यक आयुक्त ते सह आयुक्त पदांवर काम केले. 2014मध्ये महाजन यांना आयएएस केडर मिळून 2014-15मध्ये त्यांनी परभणी महापालिकेत आयुक्त पदी काम केले.त्यानंतर सध्या नागपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त म्हणून अभय महाजन कार्यरत होते.दोन दिवसांपूर्वी आयएएस अधिकायांच्या बदलीच्या यादीत महाजन यांची बदली बीडच्या जिल्हाधिकारी पदी झाल्याचे जाहीर झाले होते.मात्र बुधवारी दुपारी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीत अभय महाजन यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर झाले आहे.गेले तीन दिवस नगरचे जिल्हाधिकारी कोण असतील याबाबत मोठा संभ्रण होता.मात्र महाजन यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर हा संभ्रम संपुष्टात आला आहे.