नितीन साठे खून प्रकरणी पोलीसांना जामीन मंजूर
अहमदनगर, दि. 28- चोरीच्या संशयावरून पकडलेल्या नितीन साठे या दलित युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यु झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे,पोलीस कर्मचारी संजय डाळिंबकर,सादिक जैनुद्दीन शेख,हेमंत खंडागळे,संदीप शिंंदे अशी जामीन मिळालेल्या पोलीसांची नावे आहेत. अहमदनगर मधील कोतवाली पोलीसांनी 28 मे 2015 रोजी नितीन बाळू साठे (राहाणार जवळा,तालुका पारनेर)या तरूणाला ताब्यात घेतले होते.पोलीसांनी मारहाण केल्यानंतर दरम्यान आरोपी नितीन साठे पोलीस ठाण्यातून पळून जातांना खाली पडून जखमी झाला.नगरच्या एका प्रसिध्द खासगी रूग्णालयात उपचारा दरम्यान साठेचा मृत्यु झाला.मात्र पडल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याचा दावा पोलीसांनी केला होता.दलित संघटनांनी तीव्र आंदोलने केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडी चे उप अधिक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कोतवाली चे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यासहीत पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे,पोलीस कर्मचारी संजय डाळिंबकर,सादिक जैनुद्दीन शेख,हेमंत खंडागळे,संदीप शिंंदे अशा एकूण 6 जणांविरूध्द खून,अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सर्व जणांना अटक करण्यात आली होती.पोलीस निरीक्षक ढोकले यांचा पुण्याच्या येरवडा कारागृहातच मृत्यु झाला होता.अन्य पाचही जण आतापर्यंत जेलमध्येच बंद होते.