Breaking News

डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाची मंजूरी

लातूर, दि. 04 - राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जेदार विकास करण्याकरिता माईर्स एमआयटी,पुणे या संस्थेला विधानसभेत व विधानपरिषदेत डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विद्यापीठ स्वयं अर्थसहायित विद्यापीठ असेल.
उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टिने संशोधक वृत्तीचा विकास करणे, रोजराभिमुख उद्योजक निर्माण करणारे व नावीण्यपूर्ण व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे आदि वैशिष्ट्ये डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठामध्ये असणार आहेत.
या विद्यापीठामध्ये जगातील नामवंत कंपन्या, विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या सहकार्याने शैक्षणिक व संशोधन कार्य करून जागतिक दर्जाचे विद्यार्थी निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन या विद्यापीठाचे कार्य होत राहील.
स्वायत्ततेचा परिपूर्ण उपयोग करून उद्योगधंद्यांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार विद्यार्थी घडविणे व कुशल मनुष्यबळ तयार करणे, तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देणे हेही कार्य येथे केले जाणार आहे.
जागतिक संशोधन केंद्र व्हावे, यासाठी नवनिर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या विद्यापीठात क्रीडाक्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती अवलंबिली जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राध्यापक येथे अध्यापन करतील. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत परिवर्तन करून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील या विद्यापीठात राबविले जाणार आहेत.विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करून सुजाण, सृजनशील व जबाबदार असा मानवतावादी नागरिक घडविणे, हे या विद्यापीठाचे ध्येय असणार आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान व परंपरेनुसार वैश्‍विक मूल्यांची जाणीव येथील विद्यार्थ्यांमध्ये रूजवून भारतातील एकमेव असे विश्‍वशांतीचा संदेश देणारे हे विद्यापीठ असणार आहे.
1980 च्या दशकात महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी विनाअनुदानित तत्वावर शिक्षण संस्था सुरू करण्यात याव्यात  यासाठी माईर्स एमआयटी पुणे चे संस्थापक प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पुढाकार घेतला होता. यामुळे देशातील लाखो युवकांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. या संधींमुळे आज अनेक तरूणांची स्वत:ची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. पुण्यामध्ये सुरू असलेल्या इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, फार्मसी यांसारख्या विविध शाखांच्या कॉलेजचे संस्थापक प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या दूरदृष्टीमुळेच आज युवकांना यशाच्या अनेक वाटा दिसून आल्या आहेत. डॉ. कराड यांच्या शिक्षण क्षेत्रातील असलेल्या द्रष्टया कार्याला व त्यांच्याद्वारे जागतिक शांतता या क्षेत्रात गेली तीन दशके केल्या जात असलेल्या कार्याला सदरील डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठा  मुळे बळकटी प्राप्त होणार आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड  यांनी 1983 मध्ये एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना  केली. आज संस्थेच्या महाराष्ट्रात जवळपास 63 शिक्षण संस्था असून त्यामध्ये 60 हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.