Breaking News

लातूर जिल्हा परिषद विषय समिती सभापती बिनविरोध निवड

लातूर, दि. 04 - लातूर जल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर चार सभापतींच्या निवडीकडे सर्वंचे लक्ष लागले होते. आज चारही सभापतींची निवड झाली. पण दोघांचेच विभाग जाहीर करण्यात आले समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे हलगरा निलंगा तर महिला बालकल्याण सभापतीपदी संगिता घुले कामखेडा, रेणापूर यांची निवड करण्यात आली. उर्वरीत दोन सभापतींचे विभाग निवडी 15 दिवसांनी होणार असल्याचे सांगण्यात आले. या दोघात बजरंग जाधव आणि प्रकाश देशमुख यांचा समावेश आहे. आतापर्यंत लातूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात लातूर तालुक्याचे वर्चस्व असायचे. पण, यावेळी तालुक्याला कोठेच प्रतिनिधीत्व नाही. आज विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. यावेळी या चार पदांसाठी भाजपाच्या चारच सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानुसार निलंगा तालुक्यातील हलगरा जि.प. मतदार गटातील संजय दोरवे समाजकल्याण सभापती, अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अहमदपूर तालुक्यातील हाडोळती जि.प. मतदार गटातील प्रकाश देशमुख बांधकाम सभापती, कासार शिरसी ता. निलंगा जि.प. मतदार गटातील बजरंग जाधव कृषी सभापती तर कामखेडा जि.प. मतदार गटातील संगीता घुले या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवडल्या गेल्या आहेत. या निवडीनंतर त्या त्या सभापतींच्या समर्थकांनी, भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.समाजकल्याण विभागात मागच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करु, या विभागाला शिस्त लावू असे दोरवे यांनी सांगितले. तर महिला प्रशिक्षणावर आणि महिला सक्षमीकरणावर अधिक लक्ष देऊ असं संगिता घुले यांनी सांगितले. या निवडीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अहिल्या गाठाळ, उप मुख्य कार्यकरी अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादीचे गटनेते मंचकराव पाटील, काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, सोनाली रमेश थोरमोटे, सुभाष पवार, धीरज देशमुख, नारायण लोखंडे, प्रिती शिंदे, डॉ. संतोष वाघमारे उपस्थित होते.