Breaking News

बिडी कामगारांना सरकारच्या योजनेनुसार घरकुल देण्याची मागणी

पुणे, दि. 27 - भारत सरकारच्या इंटिग्रेटेड हाऊसिंग स्किम फॉर बिडी वर्कर्स या योजनेनुसार बिडी कामगारांच्या घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व बिडी कामगार सहभागी झाले होते. यावेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नरेश पासकंटी, उमेश विश्‍वाद, अर्जुन चव्हाण, सचिन मेंगाळे, राजाराम येमुल, वासंती तुम्मा, रेणुका इराबत्तीन, अनिता बेत, विजया पासकंटी, विजयालक्ष्मी कोंगे, रुकैय्या शेख, गीता नागुल, रेणुका श्रीमल, गीता वल्लाकट्टी आदी उपस्थित होते.
बिडी कामगारांना घरकुल मिळावे यासाठी अनेक अंदोलने करण्यात आली परंतु अद्याप घरे मिळाली नाहीत.  कामागरांच्या घरकुलासाठी लोहगाव येथील सेक्टर नंबर 35 मधील जमीन देण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. हा प्रस्ताव मंजूर करून कामगारांना त्यांची हक्काची घरे देण्यात यावी यासाठी हे उपोषण करण्यात आले होते.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी बिडी कामगारांच्या जमिनीकरिता पालकमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन संघटनेचे पत्र देण्यात येईल. तसेच बिडी कामगारांना लवकर जमीन मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे आश्‍वासन दिले. शासनाने 31 मे पर्यंत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा भारतीय मजदूर संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.