Breaking News

जिवंत जाळल्याच्या प्रकरणातुन पंडागळे यांची निर्दोष सुटका

बुलडाणा, दि. 27 - फिर्यादी विठ्ठल सुखदेव हिवाळे रा. सातगांव भुसारी यांनी चिखली येथे फिर्याद दिली होती की, त्यांची मुलगी नामे स्वाती हिचा विवाह घटनेच्या अगोदर जवळपास 5 वर्षापुर्वी आरोपी नामे प्रविण अरुण पंडागळे, रा.शेलगांव जहाँगीर यांचेसोबत झाला होता. आरोपीने लग्नाच्या 5 ते 6 महिन्यानंतर स्वातीला ऑटोरीक्षा घेण्यासाठी 50 हजार रुपये आणण्यासाठी त्रास देणे सुरू केले व त्या कारणावरुन आरोपी त्याचे पत्नीला सतत मारहाण करीत होता. दिनांक 5 जुलै 2016 रोजी संध्याकाळी 7.30 वाजताचे सुमारास आरोपी प्रविण व त्याची पत्नी स्वाती यांच्यामध्ये भांडण झाले त्यावेळी आरोपी हा जेवण न करताच झोपला व रात्री 2 वाजताचे सुमारास उठून त्याने घरातील काचेच्या बाटलीतील रॉकेल स्वातीचे अंगावर टाकून तिला पेटवून दिले व लहान मुलाल घेवून घराबाहेर पळून गेला. त्यानंतर तिला जळालेल्या अवस्थेत तिचा दिर पवन अरुण पंडागळे, किरण मच्छिंद्र पंडागळे, नंदाबाई पंडागळे यांनी ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे उपचाराकरीता भरती केले. परंतू तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे पाठविण्यात आले.
सामान्य रुग्णालयाात भरती असतांना स्वाती पंडागळे हिचे तपास अधिकारी पीएसआय एम.व्ही.दवणे यांनी मृत्यूपुर्व जबानी घेतली असता तिने सांगितले की, दिनांक 5 जुलै 2016 रोजी संध्याकाळी 7.30 वाजताचे सुमारास आरोपी प्रविण व माझे भांडण झाले त्यावेळी आरोपी हा जेवण न करताच झोपला व रात्री 2 ते 2.30 वाजताचे सुमारास उठून त्याने घरातील काचेच्या बाटलीतील रॉकेल माझे अंगावर टाकून मला पेटवून दिले व लहान मुलाला घेवून घराबाहेर पळून गेला.
सदर घटना स्वाती हिने तिचे आईवडिलांना सुध्दा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे सांगितली व उपचार सुरू असतांना दिनांक 9 जुलै 2016 रोजी तिचा मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद मयत स्वातीचे वडीलांनी दिनांक 6 जुलै 2016 रोजी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली. त्यावरुन आरोपी प्रविण अरुण पंडागळे यांचेविरुध्द अपराध क्र323/2016 भादंवि चे कलम 498(अ), 302, 504 प्रमाणे दाखल करुन पी.एस.आय दवणे यांनी सर्व संबंधित साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवुन व आवश्यक ते पंचनामे नोंदवुन आरोपीचे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरण न्यादानासाठी बुलडाणा येथे जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.एल.गजभिये यांचेसमोर न्यायप्रविष्ट करण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे कार्यकारी दंडाधिकारी, विविध तपास अधिकारी, संबंधित डॉक्टर, मृतकाचे आईवडिल व संबंधित पंच तसेच तपास अधिकारी पीएसआय दवणे यांच्यासह 17 साक्षदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यांचा उलट तपास आरोपीचे वकील अ‍ॅड.आर.एफ.खुर्दे यांनी केला.
सरकार पक्षाचा व आरोपी पक्षाचा प्रदिर्घ युक्तीवाद ऐकण्यात आला व आरोपीच्या वतीने अ‍ॅड.आर.एफ.खुर्दे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानुन विद्यमान न्यायालयाने आरोपीची भादंवि चे कलम 498(अ), 302, 504 या कलमातून निर्दोष सुटका केली. अ‍ॅड.आर.एफ.खुर्दे यांना त्यांचे सहकारी अ‍ॅड.जयपाल बडगे व अ‍ॅड.शरद विष्णू ताठे यांनी मोलाचे सहकार्य केले.