Breaking News

नाला खोलीकरण व सिमेंट बंधार्‍याचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 27 - पावसाचा लहरीपणा, दुष्काळी परिस्थिती यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे पाणी अडविणे पाणी जिरविणे हि आजही काळाची गरज असून ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोणार तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या सुंदर अश्या कल्पनेतून मागील वर्षापासून नाला खोलीकरण, रुंदीकरनाच्या कामाची सुरवात अंजनी खुर्द, देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर, शिवनी जाट गावामध्ये लोकवर्गणीतून केली. यामध्ये आपला गाव आपला विकास हा उपक्रम राबविल्यामुळे परिसरातील जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. विहिरीचा व बोअर चा पाणीसाठा वाढल्यामुळे परिसरातील शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे.
तहसीलदार यांनी मागील वर्षाचा उपक्रम याही वर्षी सुरु करताना एक अगळी वेगळी सुरवात तालुक्यातील किन्ही गावातील नाला रुंदीकरण, खोलीकरण करून  सिमेंट बंधारा बांधण्यासाठी  केली ती अशी कि आपल्या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त दहा हजार रुपये सहभाग दिला व तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्त दहा हजार रुपये सहभाग दिला. लोणार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी 100 गोनी सिमेंट दिले तर मेहकरचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी सुद्धा 100 गोनी सिमेंट दिले. या कामाची सुरुवात करताना तहसीलदार यांनी किन्ही गावात वारंवार जाऊन तेथील शेतकरी बांधवाना पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाचे महत्व पटवून देऊन कामाला सुरवात केली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, शेतकरी बांधव दिनकर तनपुरे, मंदार तनपुरे, प्रल्हाद नागरे, किशोर तनपुरे, दिनकर नागरे, संजय तनपुरे, राजू तनपुरे, इकबाल अली, पंढरी नागरे या शेतकर्यांनी लोकवर्गणी दिली.