Breaking News

समृद्धी महामार्गासाठी मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध

औरंगाबाद, दि. 19 - पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथे समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी जमीन मोजणी करणार्‍या पथकाला शेतकर्‍यांनी सोमवारी पिटाळून लावले. जवळपास 200 शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रस्ते विकास महामंडळाच्या पथकाला संमती असलेल्या एकाच शेतकर्‍याची जमीन मोजून माघारी परतावे लागले. या प्रकारामुळे पळशी परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग पळशी गावातून जाणार आहे. जवळपास 60 शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यासाठी मार्कींग करण्यात आली आहे. पळशी शिवारात सोमवारी दुपारी दोन वाजता पथक मोजणीसाठी आले. मोजणीला संमती असलेले शेतकरी ज्ञानेश्‍वर पळसकर यांच्या शेतात मोजणी करण्यात आली. त्यानंतर नानासाहेब पळसकर यांच्या जमिनीची मोजणी सुरू केली. या मोजणीला कृती समितीचे नेते नानासाहेब पळसकर यांनी विरोध केला. संमतीशिवाय तुम्ही कसे आलात अशी विचारणा करीत पळसकर यांनी पथकाला मोजणी थांबवण्यास सांगितले. काही वेळ मोजणी थांबवून पथकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या तीन व्हॅन बंदोबस्तासाठी आल्या. तणाव वाढल्यानंतर 200 शेतकरी आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. या विरोधामुळे पथकाला काढता पाय घ्यावा लागला. शेतात घरे, गोठे, शेततळी, फळबागा आहेत. मात्र, संमतीशिवाय मोजणी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.